Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्नाटकमध्ये प्रचाराची रणधुमाळी संपली
ऐक्य समूह
Friday, May 11, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na1
शनिवारी मतदान; 15 मेला मतमोजणी
5बंगलोर, दि. 10 (वृत्तसंस्था) : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी आणि अस्तित्वाच्या लढाईसाठी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता संपली. राज्यातील विद्यमान सत्ताधारी काँग्रेसचे सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जोरदार प्रचार करून वातावरण ढवळून काढले. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची धुळवड झाली असून आता विधानसभेच्या 224 जागांसाठी शनिवारी (दि. 12) होणारे मतदान आणि त्यानंतर मंगळवारी (दि. 15) होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटकातील जयपराजयाचे गणित जाती-पातींच्या मतदानावर अवलंबून आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर आले असून काँग्रेस, भाजप आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांचा प्रचार विकास आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांभोवती फिरत होता. या पक्षांनी प्रचारात विकासाचे दावे करताना भ्रष्टाचारावरुन एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. मात्र, प्रत्यक्षात राजकीय पक्षांनी प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर कितीही भर दिला असला तरी प्रत्यक्षात जातीपातींचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. प्रचारात राजकीय नेत्यांनी सांप्रदायिकता, धर्मनिरपेक्षता आणि संधीसाधूपणा अशी शब्दफेक केली असली तरी जातीपातीची समीकरणे कोण योग्य पद्धतीने जुळवणार, यावर यशापयश अवलंबून आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत, वोक्कालिग यांच्यासह दलित व मुस्लीम मते अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरणार आहेत. एससी आणि एसटी समाजाची लोकसंख्या मोठी असून ही मते महत्त्वाची आहेत.   
कुरुबा आणि अन्य मागासवर्गीय मतांवरही निकाल अवलंबून आहे. दरम्यान, कर्नाटकात भाजप 130 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्‍वास पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे तर काँग्रेसच सत्ता राखणार, असा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी व भाजपवर जोरदार टीका केली तर पंतप्रधान मोदींनी ‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदोपदी अपमान केल्याचे सांगितले.
मठांची भूमिका महत्त्वाची ठरणार?
दरम्यान, कर्नाटकातील राजकारणात मठांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक मठाचा प्रभाव काही जिल्ह्यांपुरता मर्यादित असला तरी कर्नाटकातील मठ एक प्रकारे सत्तेची केंद्रे ठरवणारे असल्याचे मानले जाते. राज्यातील प्रत्येक मठ विशिष्ट समाजाचे श्रद्धास्थान असून या मठांचे अधिपती त्या समाजाचे मतदान कोणत्या पक्षाला जावे याची दिशा ठरवतात. या मठांकडून शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, अनाथाश्रम चालवले जात असल्याने त्यांचा प्रभाव मोठा आहे. त्यामध्ये लिंगायत समाजाचे केंद्र असलेला सिद्धगंगा मठ (तुमाकुरू), दलित मडिगा समाजाचा अहिंद मठ (मदारा गुरू पीठ, चित्रदुर्ग), वोक्कालिग समाजाचा आदिचुंचनगिरी मठ (मंड्या) आणि ब्राह्मण सिद्धपुरुष मठाधिपती असलेला श्रीकृष्ण मठ (उडुपी) या मठांचा त्या त्या समाजातील मतांवरील प्रभाव मोठा आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: