Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारे, पावसाचा तडाखा
ऐक्य समूह
Friday, May 11, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: mn1
घरांचे पत्रे उडाले; फळबागांचे नुकसान; किरकसालमध्ये तिघे जखमी
5सातारा, दि. 10 (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून) : जिल्ह्यातील कराड व माण तालुक्यातील अनेक भागांना गुरुवारी दुपारी वादळी वार्‍यासह पावसा-ने चांगलाच तडाखा दिला. कराड तालुक्यातील उंडाळे, मसूर, माण तालुक्यातील गोंदवले, किरकसाल या भागांना पावसाने झोडपून काढले. वादळी वार्‍यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझडही झाली. या पडझडीमुळे किरकसाल येथे एक महिला व दोन जखमी झाले आहेत. कराड शहर व रहिमतपूर परिसरात पाच-दहा मिनिटे किरकोळ पाऊस झाला.
जिल्ह्यात आज सकाळपासूनच उष्मा प्रचंड वाढला होता. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. दुपारी काही ठिकाणी आभाळ अचानक भरुन आले. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर दुपारी तीनच्या सुमारास अनेक भागांना वादळी वारे व पावसाने झोडपून काढले. सातारा शहरातही सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. या पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले. काही ठिकाणचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना बराच वेळ अंधारात रहावे लागले.
मसूर-उंब्रज रस्त्यावर वाहतूक विस्कळीत
5मसूर : मसूर परिसराला गुरुवारी दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने चांगलेच धुतले. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. आंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मसूर-उंब्रज रस्त्यावर वृक्ष पडल्याने वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. तर विजेचा खेळखंडोबा झाल्याने परिसराला रात्री उशिरापर्यंत अंधारात राहावे लागले.
गुरुवारी दुपारी अचानक ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुटला आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. मसूर परिसरातील शामगाव, रिसवड, अंतवडी, चिखली, निगडी, किवळ, हेळगाव पाडळी या गावांना पावसाने चांगलेच झोडपले. पावसामुळे अनेक ठिकाणी उभी पिके व ऊस जमीनदोस्त झाला तर आंब्यासह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतात व रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अनेक ठिकाणी जाहिरातींचे फलक व घराचे पत्रे उडून गेले. पावसामुळे गेलेली वीज रात्री उशिरापर्यंत न आल्याने लोकांना अंधारात बसावे लागले. मात्र, दोन दिवसापासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला; परंतु अनेक   ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
किरकसाल परिसरात तिघे जखमी
5पळशी : किरकसाल, ता. माण परिसराला गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. आठ घरांच्या छतांचे पत्रे, लोखंडी अँगल्स, कौले उडून जाऊन आठ कुटुंबे उघड्यावर आली आहेत. पडझडीमध्ये एक महिला, एक मुलगा व एक मुलगी जखमी झाली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडून तारा तुटल्याने किरकसालचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास किरकसाल परिसरात विजेचा कडकडाट व जोरदार वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे बबन विठ्ठल काटकर यांच्या घरावरील 1320 चौ. फुटांचा पत्रा आणि लोखंडी अँगल उडून गेले. त्याचबरोबर भिंती पडून त्यांच्या कुटुंबातील सविता अमोल काटकर (वय 35) यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. वरद अमोल काटकर (वय 5) याचा हात फ्रॅक्चर झाला तर श्‍वेता शैलेंद्र भोसले (वय 13) ही जखमी झाली आहे. सदाशिव रघुनाथ काटकर यांच्या 800 चौरस फुटांच्या घराचे छत लोखंडी पत्र्यासह उडून जाऊन 100 फूट अंतरावर पडले. आक्काताई वामन काटकर यांच्या घरावरील सिमेंट पत्रे, कौले, लोखंडी अँगल्स उडून जाऊन सुमारे 120 फूट अंतरावर पडली. निर्मला विश्‍वास काटकर यांच्या घरावरील छत उडून जाऊन दहा क्विंटल धान्य आणि 125 क्विंटल कांदा भिजून मोठे नुकसान झाले. बाळकृष्ण पांडुरंग काटकर यांच्या घरावरील लोखंडी पत्र्यांचे छत उडाले. निवृत्ती शिवराम काटकर, संपत जयसिंग काटकर, हनुमंत जयसिंग काटकर, मारुती यशवंत अवघडे, हनुमंत तुकाराम चव्हाण यांच्याही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील छपरे उडून गेल्याने धान्य व कांदा भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वार्‍याने वीज वितरण कंपनीचे 3 पोल पडले असून 9 पोल पडण्याच्या स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी तारा तुटल्याने परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले.
गोंदवले परिसरात वार्‍यामुळे नुकसान
5गोंदवले : गोंदवले परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वार्‍याने व पावसाने काही घरांचे पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी झाडे पडली. पाऊस जास्त वेळ झाला नाही तरी वेगवान वार्‍याने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. वारे ओसरल्यानंतर हवेतील उष्मा पुन्हा वाढला. परिसरात दुपारी उन्ह तीव्र झाल्याने वातावरणात प्रचंड उष्मा होता. मात्र, काही वेळाने अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. दुपारी तीनच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन मोठ्या वार्‍याला सुरुवात झाली. या वार्‍याचा वेग इतका होता की, काही मोठी झाडे उन्मळून पडली. थोड्याच वेळात विजेच्या कडाकडाटासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी लहान गारांचा पाऊस झाला. हवेत गारवा पसरण्यासाठी पाऊस जास्त वेळ पडणे गरजेचे होते. मात्र, फक्त दहा मिनिटात पाऊस थांबला. गोंदवलेत मोठी सहा ते सात झाडे पडली. काही ठिकाणी विद्युत तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. गावाच्या नजीक शेतात राजेंद्र माने यांच्या जनावराचा गोठा असून वार्‍याने त्यांच्या शेतातील घरावरील व जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गोठ्याच्या मागे जाऊन पडले. यात लोखंडी अँगलही वाकले. पत्रा उडाला त्यावेळी रोहित माने हा मुलगा त्याच खोलीत होता. पत्रा उडाल्यामुळे मोहटीच्या विटा इतरत्र पडल्या. घराच्या सिमेंट भिंतीना मोठ्या चिरा पडल्या. मात्र, रोहित यातून सहीसलामत बचावला. पांडुरंग पोळ यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील पत्रा सुमारे 100 फूट लांब जाऊन पडला. यातील आठ पत्र्याची पाने वाकून लाकडासह पोपट हिरवे यांच्या शेतात जाऊन पडली. गोठ्यात पोळ यांच्या पाच शेळ्या आणि आठ करडे होती. वार्‍याच्या वेगाने पत्रा शेळ्या बांधलेल्या विरुद्ध दिशेला गेल्याने शेळ्या सुखरूप राहिल्या. गोठ्याच्या भिंतीला चिरा पडल्या आहेत. या घटनेचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
उंडाळे, कराड शहरालाही तडाखा
5उंडाळे : उंडाळे परिसराला गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा जोरदार तडाखा बसला. कराड शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली. गोटे, वारुंजी फाटा व कोल्हापूर नाका परिसरात चांगल्या तर कराड शहरात काही मिनिटे हलक्या सरी पडल्या.
उंडाळे परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घराचे पत्रे उडून गेले तर झाडे उन्मळून पडली. वीज खांबांचेही नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात रात्री उशिरापर्यंत वीज गायब झाली होती. लग्नकार्य व वास्तू शांतीचे मुहूर्त असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची धांदल उडाली. जोराच्या वार्‍यामुळे एका ठिकाणी लग्नमंडपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विठ्ठलवाडी येथे वार्‍यामुळे वीज खांब पडल्याची घटना घडली. मात्र, वीज गायब असल्याने दुर्घटना टळली. तुळसण, जिंती, उंडाळे, सवादेसह परिसराला वादळी वार्‍याचा तडाखा बसला. पत्र्याचे शेड, वीज खांब पडून नुकसान झाले आहे. दरम्यान, कराड परिसरातही दुपारी पावसाने हजेरी लावली. खोडशी, गोटे, वारुंजी फाटा ते कोल्हापूर नाका परिसरात चांगल्या सरी पडल्या. कराड शहरात काही मिनिटे हलक्या सरी पडल्या. उन्हाच्या ताडाख्यामुळे हैराण झालेल्या लोकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. चांगला पाऊस झाल्याने लोक सुखावले असले तरी आंबा पिकाचे काही ठिकाणी नुकसान झाले. वादळी पावसाचा सर्वाधिक तडाखा तुळसण परिसराला बसला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: