Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मसूरमध्ये बाईकस्वारांच्या ‘धूम स्टाईल’ने नागरिकांमध्ये थरकाप .!
ऐक्य समूह
Friday, May 11, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: re3
तक्रारींकडे डोळेझाक : सामान्यांची डोकेदुखी : तरुणाईच्या वेगाचे पोलिसांना आव्हान
बाळकृष्ण गुरव
5मसूर, दि. 10 : मसूरमध्ये सुसाट धावणार्‍या ‘धूम स्टाईल’ बाईकस्वारांनी धुमाकूळ घातला आहे. जीवघेण्या वेगाने चौकाचौकातून, गल्लीबोळातून या धूम स्टाईल बाईकस्वारांच्या करामतीने नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडत आहे. त्यामुळे या बेफाम तरुणतुर्कांना आळा बसवण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. आजवर नागरिकांतून तक्रारी होऊनही त्याकडे होणारा कानाडोळा, यामुळे या प्रवृत्तीत कमालीची वाढ होत आहे. स्वयंघोषित भाई आणि फुकट चंबू बाबूरावांनंतर ‘धूम स्टाईल’वाले बाईकस्वार महिला व मुलींबरोबरच सामान्यांची मोठी डोकेदुखी ठरली आहे. अशी वस्तुस्थिती असली तरी ‘धूम स्टाईल’ बाईकस्वारांवर आजपर्यंत फारशी कारवाई झालेली दिसत नाही. या  बाईकस्वारांवर चालणार्‍या स्वारांकडे होणारी डोळेझाक हा एक संशोधनाचा विषय तितकाच चर्चेचा विषय ठरला आहे.
याबाबतची माहिती अशी, की मसूरमध्ये सध्या ‘धूम स्टाईल’ बाईक स्वारांची क्रेझ वाढली आहे. एका दुचाकीवर कधी डबल, ट्रिपल तर कधी चौबल सीट बसवून तोंडात गुटखा, मावा तंबाखूचा बुकणा भरून पिचकार्‍या मारत, तर कधी मद्यपान करून बाईकवरून धूमस्टाईलने सुसाट धावणार्‍या बाईक कर्कश आवाजात हॉर्नची सर्वांना साक्ष देत चौकाचौकातून गल्लीबोळातून बेभान होऊन जाताना नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडाल्याशिवाय राहात नाही. यामध्ये अल्पवयीन शाळकरी, कॉलेज तरुणांबरोबरच काही रिकामटेकड्या स्वयंघोषित भाईंचा तसेच इतर जणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश पहायला मिळतो. दुचाकीचा वेग किती असावा, याचे भान त्यांना राहिलेले नसून आपल्या चुकीच्या  कृत्यामुळे स्वतःचे व इतर गाड्या आणि पादचार्‍यांचे अपघात होऊन काही बरे वाईट घडेल, याची भीतीही या धूमस्टाईल  बाईकस्वारांना राहिली नाही. कुणी सामाजिक हितापोटी या तरुणांना अटकाव केला तर उलट त्याला दमदाटी करण्यापर्यंत मजल गेल्याचा काहींना अनुभव आल्याने समजून सांगून त्यांनी समजून घेण्याची प्रक्रियाबाहेर त्यांचे वर्तन झाले आहे. तेव्हा मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.
 सदर धावणार्‍या दुचाकी स्वतःची मित्राची किंवा थोड्या वेळासाठी मागून आणलेली असते. त्यातच मालक कोण, चालवणारा कोण हा एक संशोधनाचा विषय बनला आहे, शिवाय कितीजणांकडे लायसेन्स आहे की ती चालवणारे तरुण अल्पवयीन आहेत आणि एका दुचाकीवर कितीजण बसावे याला काही नियम राहिला नाही. या सुसाट धावणार्‍या दुचाकीमुळे व त्यांच्या कर्कश आवाजामुळे पादचार्‍यांसह इतर वाहनधारकांना स्वत:च काळजी घ्यावी लागत आहे. परंतु या धूम स्टाईल तरुणांना याची अजिबात धास्ती वाटत नाही.  चौकाचौकात, रस्त्यावर अगदी गजबजलेल्या ठिकाणी जसे काही स्वतःच्या मालकीच्या हक्काचा रस्ता असल्यासारखी ही मंडळी वावरत असतात. आपल्या वाहनांमुळे कुणाला त्रास, अडथळे होत आहे, याचे भान त्यांना राहिलेले नाही.
 या धूमस्टाईल बाईकस्वारांचा तरुण मुली, शाळकरी मुली, महिला यांसह सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यांच्यापुढे कर्कश बेफाम वेगाने गाडी मारण्याची शायनिंग आणि प्रत्येक प्रकारची स्टाईल झाली आहे. त्यांना आवर घालण्याची व कायद्याचा,  नियमांचा धाक दाखविण्याची पोलीस यंत्रणा सुस्तावली आहे असे प्रकार सतत वाढत जात असल्याने छोटे-मोठे अपघातही घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातही पुन्हा मांडवलीचा  प्रकार आला की कोणाची, काही तक्रार नसल्याने आणि काही टवाळभाईंची मध्यस्थी त्यामुळे बरीचशी प्रकरणे बाहेरच्या बाहेरच मिटवली जातात. त्यामुळे कायद्याचा वचक राहण्याचा प्रश्‍नच येत नाही. शिवाय संबंधित पालकांना किंवा त्या बाईक मालकांनाही याची काणकूण  लागत नाही. त्यामुळे घरातून बाहेर गेलेल्या बाईकचा कारनामा काय चालतो हे कळत नाही. यामध्ये एखादा जीवानिशी हकनाक गेल्यावर सर्वांचे डोळे उघडतील. तोपर्यंत धूमस्टाईल चे प्रकार सुरूच राहणार ....! त्यांना आवर घालणारी यंत्रणा मात्र चिरीमिरी अडकल्यावर तरुणाईचा वेग वाढत राहणार अशी उलट-सुलट चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.  या बेफिकीर जीवघेण्या प्रकारच्या अनेक तक्रारी पोलिसांच्या कानावर घालूनही कान असून बहिरे असल्यासारखा त्यांचा वावर म्हणजे हे प्रकार थांबविण्याऐवजी वाढतच आहेत. त्यात मसूरला ट्रॅफिक नावाचा हवालदारच नसल्याने पोलिसांची भीतीच दुचाकीस्वारांना राहिलेली नाही. या शिवाय आजवर धूम स्टाईल गाड्यांवर किती कारवाई झाली, किती गाड्या पकडल्या, कितीजणांना वाहन चालवण्याचा परवाना आहे,  गाडीची कागदपत्रे आहेत का, गाडीचा नक्की मालक कोण अशा प्रकारची चौकशी  मसूर दूरक्षेत्रात झालेली नाही.  संबंधितांनी याची गांभीर्याने दखल घेत  कठोर कारवाई करून या प्रकारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी मसूर भागातून जोर धरू लागली आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: