Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बलकवडी धरणातील पाणीसाठा आटला
ऐक्य समूह
Saturday, May 12, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: re1
केवळ मृत साठाच शिल्लक
5वाई, दि. 11 ः बलकवडी धरणात पाण्याचा पूर्णपणे खडखडाट झाल्याने वाई तालुक्याचा पश्‍चिम भाग, खंडाळा व फलटण तालुक्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. धरणात केवळ पाण्याचा मृत साठा सध्या शिल्लक आहे. या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पश्‍चिम भागातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  ऐन मे महिन्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बलकवडी पाटबंधारे खात्याचा नियोजनशून्य कारभार व गलथापणाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
बलकवडी धरण चार टीएमसीचे आहे. वाई, खंडाळा, फलटण या दुष्काळग्रस्त भागांसाठी या धरणाची उभारणी करण्यात आली. संपूर्ण राज्याला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बलकवडी धरण अतिवृष्टीच्या परिसरात येते. यावर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते. फलटण तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरण पूर्ण रिकामे झाले आहे. त्यागाची भूमिका घेणार्‍या भागातच ऐन उन्हाळ्यात काही किलोमीटरवरून पाणी आणावे लागणार आहे. बलकवडी धरण रिकामे झाल्याने या धरणावर अवलंबून असणार्‍या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्याच्या योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या धरणाच्या उभारणीत ज्यांनी त्यागाची भूमिका निभावली त्या लोकांच्या नशिबी पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. बलकवडी पाटबंधारे खात्याच्या गलथान नियोजनामुळे धरणात पाण्याचा थेंब शिल्लक राहिला नाही. पिण्याच्या पाण्याच्या योजना संकटात आल्या आहेत. करोडो रुपये खर्च झालेल्या  जललक्ष्मी योजनेचे भवितव्यही अडचणीत आहे. संबंधित विभागाने या भागातील लोकांच्या त्यागाचा विचार करून पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी उपाययोजना करावी.
सध्या उन्हाळ्याची सुट्टी व लग्नसराईमुळे मुंबईकरांचा मोठा राबता राहणार आहे. लग्न कार्यासाठी आलेल्या मुंबईकरांचा जीव मेटाकुटीस   आला आहे. या भागातील लोकांना मिळालेल्या फलटण तालुक्यातील जमिनी कसण्यायोग्य नसल्याने त्या विकून काही जण कायमचे मुंबईस वास्तव्य करण्यासाठी निघून गेले आहेत. या भागात वस्ती खूप कमी शिल्लक आहे. त्या लोकांना निदान पिण्यासाठी तरी पाणी मिळावे अशी अपेक्षा आहे. पाटबंधारे खात्याविषयी लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. गतवर्षी पावसाचे प्रमाण योग्य नसल्याने धरणातील पाण्याचे नियोजन करता आले नाही. परंतु शेकडो गावांच्या उदरनिर्वाहासाठी  सुरू केलेल्या जललक्ष्मी योजनेसाठी जो खर्च झाला तो पाण्यात जावू नये याची खबरदारी घेवून धरणातील पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: