Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विलासराव उंडाळकर यांना विधानपरिषद मिळाली तर आनंदच : आ. पृथ्वीराज चव्हाण
ऐक्य समूह
Saturday, May 12, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: re2
संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात
5कराड, दि. 11 : आगामी काळात विधानपरिषदेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यातील दोन काँग्रेस व एक राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल. त्यात जर काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कराड तालुक्यात आणखी एक आमदार वाढेल, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. उंडाळकरांना विधानपरिषदेवर संधी दिली जाणार असल्याचे समजते, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना त्यांनी मत व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आ. चव्हाण म्हणाले,  आगामी काळात विधानपरिषदेच्या तीन जागा रिक्त होणार आहेत. त्यामध्ये विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे   आणि तिसरी जागा संजय दत्त यांची आहे. या ठिकाणी दुसरा उमेदवार देणे थोडे मुश्किल आहे. विधानपरिषदेवर कोणाला संधी द्यायची, हे काही माझ्या हातात नाही. हा निर्णय काँग्रेस पक्ष किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे घेतील. यातील कोणाला थांबवायचे? कोणाला संधी द्यायची, हा सर्वस्वी निर्णय पक्ष घेईल. काँग्रेसकडून उंडाळकरांना उमेदवारी दिल्यास आपणाला आनंदच होईल. कराड तालुक्यात सुरु असलेल्या बाबा-काका गटाच्या मनो-मीलनाच्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोमीलन, कसले मनोमीलन, मला तर काहीच माहिती नाही’ असे सांगत याबाबत अधिक कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता फक्त स्मितहास्य केले. उंडाळकर हे कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या पाठीशी राहा, असे सांगत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर आ. चव्हाण म्हणाले, यातून त्यांना तर भाजपला मदत करू नका, असेच सांगायचे आहे. भाजपमधीलही अनेक मंडळी आज त्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांना रामराम करू लागले आहेत. मोदी हटावचा नारा देत आहेत आणि उंडाळकरांनी तर अनेक वर्षे काँग्रेसचेच काम केले आहे. त्यामुळे मोदी हटविण्यासाठी ते काँग्रेसला साथ देताहेत, ही समाधानकारक बाब आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: