Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘एटीएस’चे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या
ऐक्य समूह
Saturday, May 12, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: mn1
कर्करोगाला कंटाळून स्वत:वर गोळी झाडली
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी प्रदीर्घ आजाराला कंटाळून शुक्रवारी दुपारी आत्महत्या केल्याने राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कॅन्सर या दुर्धर आजारावर गेली तीन वर्षे सुरू असलेले उपचार आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यातून रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. एका कर्तबगार अधिकार्‍याच्या वादळी कारकिर्दीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने पोलीस दलासह सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्य पोलीस दलातील अत्यंत तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जाणारे हिमांशू रॉय गेली तीन वर्षे दुर्धर आजाराने त्रस्त होते. विदेशात व नंतर मुंबईत उपचार घेतल्यावर ते कर्करोगातून मुक्त होतायत असे वाटत असताना पुन्हा या रोगाचे उचल खाल्ली. त्यामुळे रॉय हे निराश होते. अखेर या आजाराला कंटाळून त्यांनी राहत्या घरी आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वर तोंडात धरून गोळी झाडून घेत जीवनयात्रा संपवली. हिमांशू रॉय यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये आजाराला कंटाळून आपण आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. रॉय यांनी गोळी झाडून घेतल्याचे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी व सुरक्षारक्षकांनी त्यांना जवळच्या बॉम्बे इस्पितळात हलवले; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पिळदार शरीराचा हळवा अधिकारी!
1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या हिमांशू रॉय यांची कारकीर्द लक्षणीय होती. महत्त्वाची पदे भूषवताना त्यांनी अनेक महत्त्वाची व हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली होती. आयपीएलमधील मॅच फिक्सिंगचे प्रकरण त्यांनीच बाहेर काढले होते. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन व अभिनेता विंदू दारासिंग यांना आयपीएल फिक्सिंग प्रकरणी रॉय यांनीच अटक केली होती.
या शिवाय पत्रकार जे डे हत्या प्रकरण, दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा चालक आरिफवर झालेला गोळीबार, विजय पालांडेचा सहभाग असलेले दुहेरी हत्या प्रकरण, लैला खान हत्या प्रकरण, पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणाचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. एटीएसचे प्रमुख म्हणून आपल्या कारकिर्दीत त्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचणार्‍या अनीस अन्सारी या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली होती. वांद्रे कुर्ला संकुलातील अमेरिकन शाळा उडवून द्यायचा अन्सारीचा कट होता. व्यायामाची आवड असलेल्या हिमांशू रॉय यांचे शरीर पिळदार होते. ते न चुकता दररोज जिममध्ये जाऊन व्यायाम करत. तडफदार, पण हळव्या स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. मुंबईत पहिली सायबर गुन्हे शाखा स्थापन करण्याचे श्रेय हिमांशू रॉय यांना जाते.
ग्रामीण महाराष्ट्रातील दरोडेखोरी संपवण्यासाठी त्यांनी आखलेल्या उपाययोजना यशस्वी ठरल्या  होत्या. महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी त्यांनी विशेष विभाग सुरू केला होता. अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळणार्‍या रॉय यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह 2014 मध्ये झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. अशी सुरक्षा पुरवण्यात आलेले रॉय हे पहिले पोलीस अधिकारी होते. आपल्या सहकारी अधिकार्‍यांच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवणारे आणि  त्यांना काम करण्यास मोकळीक देणारे अधिकारी म्हणून रॉय लोकप्रिय होते. त्यांचा विश्‍वास सार्थ करण्यासाठी हाताखालचे अधिकारी तपासासाठी मेहनत घेत. त्यामुळे रॉय यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल झाली.
कसाबच्या फाशीत महत्त्वाची भूमिका!
मुंबई दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात हिमांशू रॉय यांचा मोलाचा वाटा होता. कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. मोजक्याच अधिकार्‍यांना याबाबत कल्पना देण्यात आली होती. फाशीच्या अंमलबजावणीसाठी त्यावेळी गृहमंत्रिपदावर असलेल्या आर. आर. पाटील यांनी ज्या मोजक्या पोलीस अधिकार्‍यांची निवड केली होती, त्यात हिमांशू रॉय यांचा समावेश होता. कसाबला आर्थर रोड कारागृहातून पुण्याच्या येरवडा कारागृहापर्यंत नेण्याची जबाबदारी हिमांशू रॉय यांच्यावर होती. हिमांशू रॉय यांनी आपली चोख जबाबदारी पार पाडत कसाबला येरवड्यात पोहोचवले होते
पोलीस दलात हळहळ
राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी गृहमंत्री जयंत पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हिमांशू रॉय यांच्यासमवेत काम केलेल्या त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: