Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भुजबळांनी घेतली शरद पवार यांची भेट
ऐक्य समूह
Saturday, May 12, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : तब्बल दोन वर्षांनंतर जामिनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. पवारांनी आपल्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर एक दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांनी आता भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज सकाळी छगन भुजबळ यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पेडर रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ येथील निवासस्थानी भेट घेतली. जामीन मिळाल्यानंतर भुजबळ आणि पवार यांच्यातील ही पहिली भेट होती. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भुजबळ व पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्यानंतर भुजबळ पुन्हा आपल्या सांताक्रुझ येथील निवासस्थानी परतले. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: