Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वस्ती साकुर्डी येथे 144 जणांना गॅस्ट्रोची लागण
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: re2
अशुध्द पाण्यामुळे लागण; पाइपलाइनला लिकेज
5कराड, दि. 13 : दूषित पाणी पिल्याने वस्ती साकुर्डी येथील सुमारे 144 जणांना गॅस्ट्रोसदृश साथीची लागण झाली असून संबंधितांवर ग्रामपंचायतीमध्ये कराड तालुका आरोग्य विभागामार्फत स्थापन केलेल्या आत्पकालीन आरोग्य सेवा केंद्रासह सातारा जिल्हा रुग्णालय, कराडच्या उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल, बहुलेकर हॉस्पिटल, कोळेकर हॉस्पिटल व इतर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, गावाला पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य पाइपलाइनला चार-पाच ठिकाणी असलेले लिकेज काढण्यासाठी संपूर्ण गावाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला असून पाणी उकळून थंड करुन पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सहा वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य पथकातील विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांसह सर्व कर्मचार्‍यांकडून ग्रामस्थांना आरोग्यविषयक सेवा देण्याबरोबर ग्रामस्थांमध्ये आरोग्य विषयक जागृती करण्यात येत असून ग्रामपंचयातीने पाण्यामध्ये वापरण्यासाठी घरोघरी मेडिकोलरचे वाटप केले आहे.
वस्ती साकुर्डी येथे कालपासून ग्रामस्थांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. सायंकाळपासून रात्रीपर्यंत सुमारे 100 हून अधिक जणांची त्यात भर पडली. या त्रासाची तीव्रता वाढल्याने गावांमध्ये खळबळ उडाली. यातील अनेकजण कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल, कोळेकर हॉस्पिटल, बहुलेकर हॉस्पिटलसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. दरम्यान, कराड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने तातडीने साकुर्डी ग्रामपंचायतीमध्ये  आत्पकालीन आरोग्य सेवा केंद्र सुरु केले. सुपने व कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने सुरु केलेल्या या आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. सुनील कोरबु, डॉ. सुशीलकुमार घोगरे, डॉ. अभय पवार, डॉ. रघुनाथ पाटील, डॉ. सुप्रिया बनकर, डॉ. बालाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरु करुन सुमारे 117 रुग्णांची गावातच तपासणी करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. तर कृष्णा रुग्णालयात 7 रुग्णांवर, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात 27 रुग्णांवर (यामधील दोन रुग्ण सातारा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत), कोळेकर हॉस्पिटलमध्ये 2, बहुलेकर हॉस्पिटलमध्ये 2 व इतर खासगी हॉस्पिटलमध्ये 5 रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
गावाला पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य पाइपलाइनला चार-पाच ठिकाणी लिकेज आढळून आले आहे. या पाइपलाइनमधून दूषित पाणी पुरवठा झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर काही ग्रामस्थांनी बाहेरील पाणी पिले होते. तर काही ग्रामस्थ एका लग्नासाठी जाऊन आले होते.  दूषित पाण्यामुळे हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोगरे यांनी
व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा बंद ठेवून पाइपलाइनचे लिकेज काढण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर घरोघरी मेडिकोलरचे वाटप केले आहे. गावात दवंडी घेवून व नोटीस बोर्डाद्वारे निवेदन करुन ग्रामस्थांना पाणी उकळून पिण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी ए. बी. कोळी, आरोग्य सहाय्यक के. एस. पवार, ए. बी. काळे, एस. आर. कोरे, एम. ए. पटेल, संजय माळी, आरोग्य सेवक सी. जे. पाटील, एस. डी. जाधव, एस. एस. गायकवाड, एस. ए. शिंगाडे, एस. आर. दुर्गावळे, एस. एस. साळुंखे, वानखेडे, मगरे, गुजर, मुळीक यांच्यासह गावातील आशा स्वंयसेविकांच्या मदतीने गावात सर्व्हे करुन संशयितांवर उपचार करण्याबरोबर आरोग्यविषयक जागृती करण्यात येत आहे. दरम्यान, पाच संशयित रुग्णांचे शौच नुमने आणि पाच ठिकाणचे पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून परिस्थितीची माहिती घेत आरोग्य सेवा व औषधोपचाराबाबत सूचना केल्या आहेत. गॅस्ट्रोसदृश साथीच्या लागणीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण असले तरी आरोग्य विभाग तातडीने उपाययोजना राबवत साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न
करत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: