Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दलित नेत्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार : सिद्धरामय्या
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: na1
5कर्नाटक, दि. 13 (वृत्तसंस्था) : ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी पक्षाने दलित नेत्याची निवड केल्यास मी माझे मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार आहे’, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे.
दरम्यान, काँग्रेसला जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे समर्थन मिळवण्यासाठी सिद्धरामय्या यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. सिद्धरामय्या हेच पुन्हा मुख्यमंत्री बनणार असतील तर जनता दल काँग्रेसला समर्थन देणार नाही असे मानले जात आहे. मात्र टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धरामय्या यांनी दलित नेत्यासाठी आपण मुख्यमंत्रिपदाचा त्याग करण्यास तयार असल्याचे वक्तव्य करत जनता दलाचे धर्मनिरपेक्ष पक्षाचे समर्थन मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे.
दरम्यान, पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही हे लक्षात आल्यानेच सिद्धरामय्या यांनी ही भूमिका घेतली असली पाहिजे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात ऐकू येऊ लागली आहे. काल प्रसिद्ध झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांनुसार कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल अशी स्थिती नाही. अशात सरकार स्थापन करण्यासाठी जनता दल किंगमेकरची भूमिका वठवू शकते.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी यापूर्वीच भाजपसोबत न जाण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ते आपल्याला समर्थन देतील, असे काँग्रेसला वाटत आहे. मात्र एकत्र यावे की न यावे याचा निर्णय आम्ही नाही तर काँग्रेसने घ्यायचा आहे, असे जनता दलाचे म्हणणे आहे. जनता दलाने भाजपसोबत केलेला घरोबा 2008 मध्ये तुटला होता. तेव्हापासून या दोन पक्षांचे संबंध चांगले नाहीत. या कारणामुळे जनता दल भाजपला समर्थन देईल याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे जनता दलासाठी काँग्रेससोबत येण्याच्या मार्गात सिद्धरामय्या हे एक अडथळा असल्याचे मानले जात आहे. 2005 मध्ये स्वत: देवेगौडा यांनी सिद्धरामय्या यांना पक्षातून काढून टाकले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हे लक्षात घेता समर्थन हवे असल्यास सिद्धरामय्यांना बाजूला करावे, अशी अट जनता दलातर्फे काँग्रेसपुढे ठेवली जाऊ शकते.
विशेष म्हणजे, देवेगौडा यांनी सध्या आपण कोणतीही गोष्ट नाकारणे अथवा स्वीकारणे अशा मनस्थितीत नसल्याचे आजच सकाळी जाहीर केले आहे. देवेगौडा यांचे हे वक्तव्य म्हणजे जनता दलाने युतीबाबतचे सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सिद्धरामय्या यांचे हे वक्तव्य काँग्रेसचे समर्थन मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: