Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंबईत दहशतवाद्यास अटक
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : पाकिस्तानमधून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन परतलेल्या एका संशयित दहशतवाद्याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. एटीएसने दि. 11 मे रोजी ही कारवाई केली. 31 वर्षीय संशयिताला 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संशयिताने अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याच्या योजना आखल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
मुंबईमधील एक तरुण पाकिस्तामधील दहशतवादी संघटनेच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेऊन नुकताच मुंबईत परत आल्याची माहिती पथकाच्या जूहू युनिटच्या हाती लागली. यानंतर एटीएसच्या पथकाने त्या तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली. महाराष्ट्र एटीएसने ही माहिती दिली आहे.
या तरुणाकडून पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एका बॉम्बस्फोटातील हव्या असलेल्या आरोपीने या तरुणाला मुंबईतून शारजाह येथे बोलावून घेतले. त्यानंतर तो शारहाज येथे काही दिवस राहिल्यानंतर त्याला दुबई मार्गे कराची येथे पाठवण्यात आले. पुढे तेथून तो पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर दाखल झाला. तेथे त्याला शस्त्र चालवणे, बॉम्ब बनवणे, आत्मघातकी हल्ले करणे, आगी लावणे अशा घातक कृत्यांचे प्रशिक्षण दिले गेले.
या तरुणाने बॉम्बस्फोटातील पाहिजे असलेल्या आरोपींच्या संगनमताने कट रचून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, वर्दळीची ठिकाणे आणि अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या आस्थापना अशांवर दहशतवादी हल्ले करण्याच्या योजना आखल्या होत्या, असे तपासात आढळून आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: