Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कास पठाराला वणवा लावला...
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 13 : कासला वणवा लावला, असे वाचल्याबरोबरच उंबरठा चित्रपटातील अंगी वणवा पेटला...या गाण्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. या महिन्यात गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारे कास पठारावर वणवा लावण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. हा वणवा लागला जात नसून विघ्नसंतोषी लोकांकडून तो जाणीवपूर्वक लावला जात आहे. अशा वणवा लावणार्‍या विघ्नसंतोषी लोकांना रोखणार कोण, असा प्रश्‍न पर्यटकांमधून केला जात आहे.
सातारा शहराच्या पश्‍चिमेस 23 किलोमीटर अंतरावर कास पठार आहे. पठारावर ठराविक काळात उगवणार्‍या फुलांमुळे या पठाराचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात पसरले आहे. निसर्गरम्य परिसर, उंच डोंगराच्या दोन्ही बाजूला असलेले कण्हेर व उरमोडी धरणाचे पात्र, हिरवी गर्द झाडी, कडक उन्हाळ्यातही वाहणारा थंड वारा शिवाय प्रसिद्ध असलेला कास तलाव. त्यामुळे या भागात कायमच स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांची वर्दळ असते. राज्याच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक या भागाला दररोज भेटी देतात. याच परिसरात असलेल्या पुष्प पठारावर काही विघ्नसंतोषी पर्यटकांनी वणवा लावण्याच्या घटना घडल्या आहेत. या वणव्यामुळे पठारावरील बराचसा भाग जळून खाक झाला आहे. वाळलेले गवत व वाहणारा वारा त्यामुळे लावलेला वणवा क्षणात रौद्ररूप धारण करतो आणि बघता बघता बराचसा भाग गिळंकृत करतो. वणव्यामुळे या ठिकाणी असलेल्या वनसंपदेला त्याची झळ पोहोचत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले वन्यप्राण्यांनाही जीव गमवावा लागत आहे. रविवार, दि. 13 रोजी दुपारी कासला पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने या ठिकाणी कर्मचारी नसल्याचे पाहून वणवा लावल्याचे कास पठार कार्यकारी समितीच्या एका कर्मचार्‍याने सांगितले. कडक उन्हामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाळलेले आहे. या गवताने क्षणात रौद्ररूप धारण केले. वार्‍यामुळे हा वणवा परिसरात पसरला. वणवा लागल्याचे समजताच कास पठार कार्यकारी समितीच्या कर्मचार्‍यांनी तो विझविण्यासाठी धाव घेतली. वणव्याचे स्वरूप पाहता या कर्मचार्‍यांकडे ही आग विझविण्यासाठी झाडाच्या फांद्यांशिवाय कोणतेही साधन नव्हते. या शिवाय पायात आवश्यक असलेले बूटही नव्हते. अग्नीरोधक कोणतेही उपकरण त्यांच्याकडे नव्हते. अशा परिस्थितीतही त्यांनी साधारण दोन ते अडीच हेक्टर क्षेत्रात लावलेला वणवा विझविण्याचा शर्तीने प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये वार्‍याचा अडथळा येत होता. आगीच्या झळा सोसतच हे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडत होते. बघता बघता आगीने हा सर्व परिसर गिळंकृत करून टाकला. त्याच्या झळा या ठिकाणी असलेल्या रोपांनाही बसला. एकंदरीत परिस्थिती पाहता सरपटणार्‍या प्राण्यांचे काय झाले याचा विचार न करणेच बरे, असेच म्हणावे लागेल. वणवा लागलेला असतानाही एकही पर्यटक गाडीतून उतरून या कर्मचार्‍यांच्या मदतीला धावला नाही. उलट हा वणवा आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचाच प्रयत्न करत होते. वणवा विझविण्याचे काम केवळ वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीचेच आहे का? तुमचे आमचे काम नाही का? ही वन संपदा आपली आहे असे समजून तिचे संरक्षण करणे हे देखील आपले कर्तव्य नाही का? विघ्नसंतोषी लोकांनी लावलेल्या वणव्यामुळे वनसंपदा अशीच नष्ट होत गेली तरी कालांतराने निसर्गराजीने नटलेला हा कासचा परिसर बोडका झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्‍चित.
रविवारी लागलेला वणवा विझविण्याकामी वन विभागाचे संतोष शिंदे, श्रीरंग शिंदे, जाधव तसेच कास पठार कार्यकारी समितीचे संजय कोकरे, अंकुश अहिरे, किसन चिकणे, चंद्रकांत अहिरे, श्रीरंग आटाळे, हरिबा जांभळे, भैरू खोपडे, कोंडिबा गोरे, सावळाराम किर्दत व दगडू शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: