Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माण तालुक्यात सांगली जिल्ह्यातील वाळू तस्करांची गुंडगिरी
ऐक्य समूह
Monday, May 14, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 13 : माण तालुक्यातील माणगंगा नदीतील वाळूला काळे सोने म्हणून ओळखले जाते. याच काळ्या सोन्यावर परजिल्ह्यातील वाळू तस्करांचा डोळा आहे. गेल्या वर्षभरापासून सांगली जिल्ह्यातील वाळू तस्करांची माण तालुक्यात मुजोरी वाढली आहे. त्यांनी या काळ्या सोन्यासाठी अनेक वेळा महसूल यंत्रणेवर जीवघेणे हल्ले केले आहेत. या मुजोर वाळू तस्करांना एका पोलीस अधिकार्‍यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. या शिवाय माणच्या पूर्व भागातील दोन तलाठी देखील आपले हात ओले करत असल्याचे समजते.
माण तालुक्यात माणगंगा नदीच्या पात्रातून सध्या रात्रं-दिवस वाळू उपसा होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाळूची चोरी होत आहे. मात्र, महसूल विभागातील खालचे कर्मचारी व पोलीस यंत्रणा डोळ्यासमोर अवैध वाळू उपसा होत असतानाही झोपेचे सोंग घेत आहेत. म्हसवड, वाकी व देवापूरमधून उपसा केलेली वाळू सांगली जिल्ह्यात नेली जात आहे. कधी-कधी ही वाळू नदीतून जेसीबीच्या सहाय्याने भरली जात आहे. याला काही तलाठी व पोलिसांचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक वाळू तस्कर दिवसभर ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू बाहेर काढून त्याचा डेपो करून रात्री ट्रकमध्ये भरून हे काळे सोने सांगली जिल्ह्यात नेले जाते. या वाळू माफियांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यावरून ते तस्कर सांगली जिल्ह्यातीलच आहेत हे निष्पन्न झाले आहे. म्हसवड परिसरात नदीकाठच्या शेतकर्‍यांनाही पैसे देऊन वाळू उपसली जात आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठे डेपो आहेत. रात्रभर या परिसरातील जनतेला ट्रक, डंपर, ट्रॅक्टर व जेसीबीच्या आवाजाने झोपही लागत नाहीत. मात्र महसूलमधील तलाठी व सर्कल कारवाई का करत नाहीत? पोलिसांनी मध्यंतरी काही जणांवर मोठे गुन्हे दाखल केले मग पोलिसांना परजिल्ह्यातील वाळू तस्कर दिसत नाहीत का? परजिल्ह्यातील वाळू तस्कर म्हसवड परिसरात येऊन कुणाच्या पाठबळावर गुंडगिरी करतात? सांगलीतील वाळू तस्करांनी आजपर्यंत ट्रक पळवून नेणे व महसूल   कर्मचार्‍यांच्यावर हल्ले केले आहेत. त्यांच्यावर गंभीर कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्‍न जनतेमधून उपस्थित होत आहेत.
वर्षापासून एका पोलीस अधिकार्‍याने या वाळू माफियांचे चांगलेच बस्तान बसवून दिले आहे. हाच पोलीस अधिकारी एखादा तलाठी वाळू तस्करांची तक्रार करायला गेल्यास त्यांनाच आरोपीसारखे बसवून ठेवत असल्याची चर्चा आहे. यांच्याकडून मंथली वसुलीसाठी एकाची नेमणूक करण्यात आली आहे. तलाठ्यांचा एक नेता समजणारा तलाठी यात सामील आहे. तो दुसर्‍या गावात असतानाही म्हसवड, देवापूर परिसरात एकटाच वसुली करतो. सध्या महसूल व पोलीस यंत्रणा मंथली न दिल्यास कारवाईचा बडगा उगारत आहेत. पोलीस सर्वांना धरून आहेत. महसूल विभागातील काही महाभाग देणे-घेणे होत नसल्याने त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे माणगंगेची लूट कोणीही प्रामाणिकपणे थांबवू शकत नाही. अनेक वेळा शेतकर्‍यांनी तहसीलदारांकडे वाळू तस्करांनी विहिरी व पाइपलाइनींचे नुकसान केल्याच्या तक्रारी लेखी स्वरुपात केल्या आहेत. त्यावर काहीच कारवाई न झाल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला
आहे. मात्र महसूल- मध्ये प्रामाणिकपणे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्रास होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: लक्ष
घालून वाळू तस्करी रोखण्याची गरज आहे.
      
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: