Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चरेगावमध्ये गॅस्ट्रोसदृश साथीची लागण
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: re1
40 जणांवर उपचार सुरू; परिसरात घबराट
5उंब्रज, दि. 14 : चरेगाव, ता. कराड येथे दूषित पाण्यामुळे 35 ते 40 जणांना गॅस्ट्रोसदृश साथीची लागण झाली आहे. उंब्रज परिसरात शिवडेनंतर चरेगावमध्ये साथीची लागण झालेले रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णांवर उंब्रज व कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दहा दिवसांपूर्वी शिवडे, ता. कराड येथे गॅस्ट्रोसदृश साथीची लागण झालेले रुग्ण आढळले होते. त्यानंतर चरेगाव येथे गेल्या तीन दिवसांपासून उलट्या व जुलाबाचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने ग्रामपंचायत व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. पवार मळा व अन्य ठिकाणच्या ग्रामस्थांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दोघांवर आणि काही जणांवर शारदा नांगरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅस्ट्रोसदृश साथीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जगदाळे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी चरेगावला भेट देऊन उपाययोजनांबाबत सूचना केल्या. आ. बाळासाहेब पाटील यांनीही चरेगावकडे धाव घेऊन पाण्याच्या स्रोतांची पाहणी केली. याबाबत ग्रामसेवक राजेंद्र भोसले यांनी सांगितले, की चरेगावमध्ये पाण्याचे नऊ स्रोत असून तेथील नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पवार मळा व गावातील एका आडाचे पाणी दूषित असल्याचा संशय आहे. नागझरी विहिरीचे पाणी टाकीत सोडण्याचे 22 एप्रिलपासून बंद केले आहे. या विहिरीतील पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश साथीचा प्रश्‍न उद्भवत नाही. पाणी तपासणीबरोबर मेडिक्लोरचे वाटप ग्रामस्थांना केले असून पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आ. बाळासाहेब पाटील यांनी दूषित पाणी पुरवठा होत असलेल्या विहिरीची पाहणी करून संबंधित विभागास ही विहीर बंद करण्याची सूचना केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: