Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कॉलर खेचायची, की विजार ओढायची ते जनता ठरवेल
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: lo1
खा. उदयनराजेंचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे : ना. रामराजे यांचे टीकास्त्र
5सातारा, दि. 14 : कुणाची कॉलर वर जाणार, कुणाची खाली जाणार, कुणाचा शर्ट काढायचा, कॉलर खेचायची की विजार ओढायची हे जनता ठरवेल. सातार्‍याच्या खासदारांचे  लोकसभेतले काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे, अशा शब्दात  विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खा.श्री. छ. उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ना. रामराजेंना खा.उदयनराजे यांच्याविषयी प्रश्‍न विचारण्यात आले होते. मात्र त्यावर ना. रामराजे यांनी निवडक विधाने केली आणि ही बँकेची पत्रकार परिषद आहे, असे सांगत त्या विषयावर बोलणे टाळले. त्यानंतर पुन्हा दुपारी साडेतीनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर निवडक पत्रकारांनी ना. रामराजे यांच्याकडे पुन्हा खा. उदयनराजे हाच विषय काढला. त्यावर ना. रामराजे यांनी खा. उदयनराजे यांच्यावर जोरदार शब्दात टीकास्त्र सोडले. त्यामुळे ना. रामराजे आणि खा.उदयनराजे यांच्यामधील वाद पुन्हा एकदा विकोपा ला गेला असल्याचे समोर आले आहे.
ना. रामराजे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, कर्नाटक राज्यातील निवडणूक निकालानंतर पुढील राजकीय निर्णय खा. शरद पवार साहेब घेतील. आम्ही जिल्ह्यात नसलो, की अनेकांच्या कॉलर वर होतात. सातार्‍यातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याचा निर्णय  शरद पवार घेतील. आम्ही दुसरे कोणाला नाही, केवळ पवार साहेबांशी बांधील आहोत.
खा. उदयनराजे त्यांच्या उमेदवारीसाठी दिल्लीला गेले होते, असे विचारले असता त्यात एवढं काय जसे ते दिल्लीला जाऊन खा. पवार यांच्याशी चर्चा करतात, तसे आम्हालाही दिल्लीला जाता येते. आम्ही सातार्‍यात नसताना अनेक जण कॉलर उडवत असतात, असेही ते म्हणाले.  सातार्‍याच्या जागेबाबत खा. शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केलेली नाही. कोण म्हणत असेल आम्हाला उमेदवारी दिली आहे त्याबाबत खा. पवार यांच्यासोबत सर्व आमदार बोलतील. वेळ आल्यानंतर योग्य ते उत्तर दिले जाईल. खा. पवार साहेबांची काम करण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. खा. पवार हे सर्वांचे मत घेवून त्यानंतर निर्णय घेतात.      
निवडणुकीपूर्वी अशा चर्चा होतात. त्यांना माझ्यादृष्टीने महत्त्व नाही. या चर्चा अपरिपक्व आहेत. 10 वर्षे दिल्लीत राहून काम करण्याची चांगली संधी उदयनराजेंनी सोडली याची खंत वाटते. त्यांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे. उदयनराजेंनी बोलतो त्याप्रमाणे करून दाखवावे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे उपरोधिक वक्तव्यही त्यांनी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: