Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: na1
स्मृती इराणींचे खाते राठोड यांच्याकडे
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल केले आहेत. स्मृती इराणी यांच्याकडून माहिती आणि प्रसारण मंत्रालय काढून घेण्यात आले असून त्याची जबाबदारी क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे हंगामी अर्थमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल केले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचे खाते काढून घेण्यात आले असून ते राज्यवर्धन राठोड यांच्याकडे देण्यात आले आहे. राठोड यांच्याकडे आधी क्रीडा मंत्रालय होते. अरुण जेटली यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सोमवारी दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये करण्यात आली. त्यातून त्यांची प्रकृती पूर्ण सुधारेपर्यंत त्यांच्याकडून अर्थ खाते काढण्यात आले असून या खात्याची जबाबदारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत गोयल हे हंगामी अर्थमंत्री राहणार आहेत.   
स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खातेच राहणार आहे. दरम्यान, यापूर्वी स्मृती इराणी यांच्याकडील महत्त्वाचे मनुष्यबळ विकाम मंत्रालयही काढून घेण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्याकडून माहिती आणि प्रसारण मंत्रालय काढून घेतले गेल्याने इराणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरणाचा घोळ इराणी यांना नडल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण नुकतेच दिल्लीत झाले. त्यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काही मोजक्याच विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली होती तर उर्वरित बक्षिसे स्मृती इराणी व राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते देण्यात आली होती. त्यामुळे अनेक विजेत्यांनी या समारंभावर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्रिपद सोपवण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: