Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अनधिकृत वीज जोडणी करताना विजेच्या धक्क्याने एकाचा बळी
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: re3
जावली तालुक्यातील सरताळे येथील घटना, महावितरणचा महाभोंगळ कारभार चव्हाट्यावर
5कुडाळ, दि. 14 : सरताळे (काळेवाडी), ता. जावली येथे शेती पंपासाठी अनधिकृत वीज जोडणी देताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून हणमंत गंगाराम पोतेकर (वय 40,  रा. शेंद्रे)  या खाजगी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे महावितरणचा जावली तालुक्यातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी महावितरणचे दोषी अधिकारी, संबंधित ठेकेदार व कर्मचार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरताळे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
 या घटनेची खबर शरद मोहिते यांनी कुडाळ पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. वीज जोडणीसाठी खाजगी ठेकेदारांना काम देऊन अधिकृत वीज कर्मचारी सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करून फक्त मलिदा खाण्यासाठीच आहेत का, असा संतप्त  सवाल यावेळी उपस्थितांनी केला. महावितरणच्या महाभोंगळ कारभारामुळे या दुर्घटनेत बळी पडलेल्या हणमंत पोतेकरच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्याच्या पश्‍चात असणार्‍या आई, पत्नी व दोन मुलांना वाली कोण, असा सवाल विचारला जात आहे. 
 याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  सरताळे (काळेवाडी), ता. जावली येथे शेतीपंपासाठी वीज जोडणी करण्यासाठी शेंद्रे, ता. सातारा येथून राहुल नलावडे, गणेश जाधव, अनिल पडवळ, हणमंत पोतेकर, शरद मोहिते आले होते. हे सर्वजण वीज महावितरणसाठी खाजगी ठेकेदार अशोक गोळे (रा. हातगेघर) याच्यासाठी काम करतात. सोमवारी सकाळी वायरमन युवराज पवार याच्या  सांगण्यावरून  हे सर्वजण शेंद्रे  येथून मॅक्सिमो गाडी (क्र. एम.एच.11 एजे 4353) मधून वीज जोडणीसाठी आवश्यक साहित्य खाजगी दुकानातून खरेदी करून सरताळे येथे आले होते. याबाबत  शरद मोहिते याने दिलेली माहिती अशी, आम्ही वायरमन युवराज पवार याला कामाच्या ठिकाणी मोबाईलवरून बोलावले. परंतु त्याने आम्हाला कामाचे ठिकाण सांगून रस्त्याच्या शेजारील डीपीतून लाइन बंद करून काम सुरू करा, असे सांगितले. त्यानुसार सदर डीपीचे फ्यूज काढून काम सुरू केले व वीज तारा जोडण्यासाठी  हणमंत पोतेकर व शरद मोहिते सिमेंटच्या खांबावर चढले.  काम सुरू असल्यामुळे मुख्य वीज प्रवाह बंद होता. परंतु अचानक मुख्य वीज प्रवाह सुरू झाल्याने खांबावर काम करत असलेला हणमंत पोतेकर तारेला चिकटला. त्याला सोडवण्यासाठी मोहिते याने प्रयत्न केला. परंतु विजेच्या धक्क्याने तोही खांबावरून खाली फेकला गेला. यामध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाला.
याबाबत वीज वितरणचे कुडाळचे कनिष्ठ अभियंता अमित नाडगौंडा यांच्याकडे विचारणा केली असता सदर वीज जोडणीला अद्याप मान्यता नाही तसेच याबाबत आपणास कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, हे काम अशोक गोळे या खाजगी ठेकेदाराकडून करण्यात येत असल्याचे समजल्याने याबाबत गोळे याच्याकडे चौकशी केली असता तो वीजवितरणचा  अधिकृत ठेकेदार नाही, असे समजले तसेच हे काम आज करण्याबाबत आपण सांगितले नव्हते, असे त्याने सांगितले. वायरमन युवराज पवार याच्या सांगण्यावरून कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय केवळ रोजी रोटीसाठी तीनशे रुपये रोजावर जीवावर उदार होऊन हे कामगार काम करत आहेत. परंतु आज एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित वायरमन गायब झाला. वीज वितरणच्या  अधिकार्‍यांनी व संबंधित ठेकेदाराने हात वर केले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेत बळी पडलेल्या हणमंत पोतेकरच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे. गावठाण लाइनवरून शेतीपंपासाठी वीज जोडणी दिली जात असल्याचे समोर आले आहे तर जावली तालुक्यात शेतीच्या विजेची स्वतंत्र लाइन  केवळ कागदावरच पूर्ण आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे काम अपूर्ण असून गावठाणच्या लाइनवरूनच शेतीपंपासाठी वीज पुरवठा केला जात आहे. शेतीपंपाच्या वीज जोडणीसाठी गेली चार ते पाच वर्षे अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. परंतु तत्काळ वीज जोडण्यासाठी अनधिकृत समांतर यंत्रणा महावितरणमध्ये असल्याचेही या घटनेवरून स्पष्ट होत आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: