Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा बँकेला 51 कोटी 89 लाख रुपयांचा करोत्तर नफा
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: lo3
जिल्ह्यातील 1 लाख 50 हजार 486 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ
5सातारा, दि. 14 : राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकूण 366 कोटी 13 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. जिल्ह्यातील 1 लाख 78 हजार 955 शेतकर्‍यांपैकी 1 लाख 50 हजार 486 शेतकर्‍यांना या योजनेचा थेट लाभ मिळाला आहे. गतवर्षी नोटाबंदीमुळे बँकेला 18 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. यंदा बँकेला 51 कोटी 89 लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेची जी बजेटची सभा झाली त्यामध्ये शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. बँकेला जो काही निव्वळ नफा झाला आहे त्यातून 8 कोटी 75 लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शेती पतस्थैर्य राहण्यासाठी 5 कोटी 25 लाख, तंत्रज्ञान विकास निधी 1 कोटी, इमारत निधी 1 कोटी, गुंतवणूक चढ- उतार निधी 50 लाख, भाग भांडवल लाभांश 16 कोटी 22 लाख अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. याशिवाय सामाजिक बांधिलकी व सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी एकूण 16 कोटी 89 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अल्प भूधारक शेतकरी सभासदांसाठी 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध करून देणार आहे. असा निर्णय घेणारी देशामध्ये ही पहिलीच जिल्हा बँक आहेे. खा. शरद पवार यांच्या सूचनेनुसार माण व खटाव तालुक्यात पाणी फाऊंडेशनमार्फत जी जलसंधारणाची कामे सुरू आहेत     
त्यातील 164 गावांना 1 कोटी 60 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहेत.  शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम बांधकाम आणि संस्थेची स्वमालकीची इमारत बांधकाम यांना व्याजात संपूर्ण सूट देण्यासाठी 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. बँक पातळीवर 100 टक्के वसुलीसाठी वसुली प्रोत्साहन म्हणून विकास सोसायटीला 28 हजार 800 रुपयांप्रमाणे 2 कोटी 75 लाखाची तरतूद केली आहे. सभासद पातळीवर 100 टक्के वसुलीसाठी सोसायटीला 12 हजार रुपयाप्रमाणे प्रोत्साहन निधी देण्यासाठी 30 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या वारसास 1 लाखापर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांना 4 टक्के दराने 25 कोटी 93 लाखाचे कर्ज वितरण केले आहे.  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत 12 खातेदारांना 24 लाख आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत 8 खातेदारांना 16 लाख इतक्या रकमेचे क्लेम प्राप्त झाले आहेत. कोअर बँकिंग सर्व्हिस, एनी ब्रँच बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस, एपीबीएस, एनएसीएच आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ग्राहकांना मोबाईलद्वारे एसएमएस सेवा, नेट बँकिंग, मोफत एटीएम कार्ड व नूतनीकरण आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
नोटबंदीमुळे जिल्हा बँकेला 18 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बँकेचे आतापर्यंत 366 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने स्वीकारले आहेत. कर्जमाफीत यंत्रणा व्यस्त असल्याने 13 कोटींचा तोटा झाला. यामध्ये कारखान्यांचे 14 कोटी रुपये उत्पन्न कमी आले. तसेच गुंतवणुकीवरीलही व्याज कमी झाल्याने नफ्यात घट झाली.
यावेळी संचालक विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर, उपाध्यक्ष सुनील माने, श्रीमंत दादाराजे खर्डेकर, प्रकाश बडेकर, राजेश पाटील-वाठारकर व अधिकारी उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: