Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पलूस-कडेगावमध्ये भाजपची माघार
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: mn2
विश्‍वजित कदमांच्या निवडीची औपचारिकता बाकी
5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार संग्रामसिंग देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे चिरंजीव विश्‍वजित कदम हे निवडणूक लढवत असून शिवसेनेने त्यांना आधीच पाठिंबा दिला होता तर भाजपनेही आज माघार घेतली. त्यामुळे विश्‍वजित कदम यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकताच आता बाकी आहे. मात्र, पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी कायम ठेवल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे.
लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या एका जागेसाठी 28 मे रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसने त्यांचे चिरंजीव विश्‍वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने संग्रामसिंग देशमुख यांना उमेदवारी दिली होती; परंतु शिवसेनेने वेगळी भूमिका घेत विश्‍वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केल्याने भाजपची पंचाईत झाली होती. पालघर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार काँग्रेसने मागे घेतला तर आम्ही पलूस-कडेगावमधील उमेदवार मागे घेऊ, असा अनौपचारिक प्रस्ताव भाजपने काँग्रेसला दिल्याची चर्चा होती; परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही शक्यता फेटाळून लावली. अखेर भाजपने आज पलूस-कडेगावमधून संग्रामसिंग देशमुख यांची उमेदवारी मागे घेतली.
संग्रामसिंग देशमुख यांचा अर्ज मागे घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील स्वतः तेथे गेले होते. संग्रामसिंह देशमुख आणि जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये कडेपूर येथे पक्ष कार्यालयात बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेनंतर संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज मागे घेत असल्याचे चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले. विद्यमान आमदार किंवा खासदार दिवंगत झाल्यास तिथे उमेदवार न उभा करण्याची आपली परंपरा भाजप कायम ठेवत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.           
पालघरमध्ये चौरंगी लढत
पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सात उमेदवार असले तरी शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, काँग्रेसचे दामोदर शिंगडा, भाजपचे राजेंद्र गावित व बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यातच खरी लढत आहे. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे होत असलेली ही निवडणूक लढवण्यासाठी वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास हे इच्छुक होते; परंतु भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. केंद्रात व राज्यात सत्तेत एकत्र असताना भाजपकडे असलेल्या जागेवर उमेदवार उतरवून शिवसेनेने कुरघोडी केली तर भाजपने काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी भाजपकडून बरेच प्रयत्न केले गेले; परंतु शिवसेनेने त्याला दाद न देता श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी कायम ठेवल्याने युतीतील तणाव वाढला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: