Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शशी थरूर यांच्यावर आरोप
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: mn1
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल केले आहे. शशी थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा थेट आरोप पोलिसांनी या आरोपपत्रात केला आहे. थरूर यांनी मात्र हे आरोपपत्र हास्यास्पद आणि विसंगत असल्याचा दावा केला आहे तर या प्रकरणी वैज्ञानिक पद्धतीने तपास करून हा निष्कर्ष काढल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांनी पतियाला हाऊस न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी धर्मेंद्रसिंग यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले आहे. शशी थरूर यांनी सुनंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा थेट आरोप पोलिसांनी या आरोपपत्रात केला आहे. भादंवि कलम 306 आणि कलम 498 (अ) अंतर्गत हा आरोप करण्यात आला आहे. भादंवि कलम 498 (अ) हे घरगुती हिंसा किंवा पत्नीसोबत क्रूर वर्तन करण्याबाबत आहे तर कलम 306 हे आत्महत्येस प्रवृत्त करण्याबाबत आहे. मात्र, हे आरोपपत्र चुकीचे, हास्यास्पद आणि  विसंगत असल्याचा दावा शशी थरूर यांनी केला आहे. या आरोपपत्राविरुद्ध आपण न्यायालयीन लढाई करू, असेही थरूर यांनी म्हटले आहे.
शशी थरूर यांनी याबाबत ट्विट करून आपली बाजू स्पष्ट केली आहे. सुनंदाला जवळून ओळखणार्‍या लोकांना हे चांगलेच ठाऊक आहे, की सुनंदा ही केवळ माझ्या एकट्यामुळे आत्महत्या करू शकत नाही, असे थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. साडेचार वर्षे तपास केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हा आरोप ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी संशय आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी कोणाविरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही, असे विधी अधिकार्‍याने 17 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते. मात्र, त्यानंतर केवळ 6 महिन्यांनंतर त्यांनी माझ्यावर सुनंदाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे. हे सर्व अविश्‍वसनीय आहे, असे ट्विट शशी थरूर यांनी केले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती भांडणांमुळे सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी 24 मे रोजी पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. 17 जानेवारी 2014 रोजी चाणक्यपुरीतल लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमधील खोली क्रमांक 345 मध्ये सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे म्हटले गेले होते; परंतु एक वर्षानंतर व्हिसेराचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली. मात्र, साडेचार वर्षांनंतरही या प्रकरणाचा छडा लागला नाही किंवा कुणाला अटकही झाली नाही. थरूर हे तपासात सहकार्य करत असल्याने त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली नव्हती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: