Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंद्रुळकोळेतील दोन्ही पाटलांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष
ऐक्य समूह
Tuesday, May 15, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re4
श्रीकांत पाटील
5सणबूर, दि. 14   : ढेबेवाडी विभागातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. ही निवडणूक राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील व जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई समजली जात आहे. दोन्ही गटांकडून भक्कम मोर्चेेबांधणी केली जात आहे. दोन्ही पाटलांच्या या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
गतवेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने माथाडी नेत्यांनी या विभागातील राजकारणात सक्रिय सहभाग घेतला व विभागातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीवर सलग 15 वर्षे वर्चस्व असलेल्या हिंदुराव पाटील गटाला आ. नरेंद्र पाटील व रमेश पाटील यांनी 11-0 ने पराभवाचा धक्का दिला होता. मात्र मंद्रुळकोळे खुर्दमध्ये सत्ता अबाधित राखण्यात हिंदुराव पाटील यांना यश आले होते. नजीकच्या काळात मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द या संयुक्त गावच्या विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत हिंदुराव पाटील यांनी 13-0 ने विजयी मिळवून पराभवाचा वचपा काढला. मात्र तद्नंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मंद्रुळकोळे गटातून जिल्हा परिषदेसाठी आ. नरेंद्र पाटील यांनी बंधू रमेश पाटील यांना निवडणुकीत उतरवले. संपूर्ण माथाडीची ताकद या निवडणुकीत लागली. या विभागातील बलाढ्य सेना व काँग्रेसला धूळ चारत विभागातील जिल्हा परिषद गटावरील 15 ते 20 वर्षाचे हिंदुराव पाटील यांचे वर्चस्व रमेश पाटील यांनी मोडीत काढले व दोन्ही पंचायत समितीच्या जगा जिंकून माथाडीच्या ताकदीचा करिष्मा दाखवून दिला.
जिल्हा परिषदेच्या विजयानंतर जिल्हा परिषद गटात झालेल्या साबळेवाडी, ढेबेवाडी, कारळे, जिंती, शितपवाडी या ग्रा पंचायती शिवसेनेच्या ताब्यातून राष्ट्रवादीच्या ताब्यात आणल्या तर महिंद, सणबूर, बनपुरी, आंबवडे खुर्द, भोसगाव, मालदन, मत्रेवाडी येथे राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राखली. काँग्रेसच्या ताब्यातील मराठवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीने खेचून आणली. यामध्ये रमेश पाटील यांची भूमिका किंगमेकरची राहिली आहे. आ. नरेंद्र पाटील यांनी या विभागात पूर्ण केलेली कोट्यवधींची विकासकामे तर सौ. प्राची पाटील यांनी प्राना फाऊंडेशनद्वारे उभे केलेले महिला संघटन
याचा मोठा फायदा राष्ट्रवादीला झाला आहे. संपूर्ण विभागात राष्ट्रवादीची विजयी घोडदौड सुरू आहे. यामध्ये रमेश पाटील यांची रणनीती
यशस्वी ठरली आहे. यामध्ये त्यांना माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. नरेंद्र पाटील, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे भक्कम पाठबळ मिळाले आहे.
ढेबेवाडी विभागात विजय संपादन केल्यानंतर खुद्द स्वत:च्या गावची मंद्रुळकोळे ग्रामपंचायत निवडणूक आ. नरेंद्र पाटील व बंधू जिल्हा परिषदेचे रमेश पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मंद्रुळकोळे गावची सत्ता अबाधित राखून गतवेळच्या मंद्रुळकोळे खुर्दच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी रमेश पाटील यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे तर मंद्रुळकोळे खुर्दमधील सत्ता अबाधित राखून मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीवर विजय मिळवून राजकारणात जोरदार कमबॅक करण्याची संधी हिंदुराव पाटील यांना असल्याने त्यांनीही संपूर्ण अनुभव व ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे दोन्ही गटासाठी ही काट्याची टक्कर बनली आहे. दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल विभागाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा ठरणार आहे.
मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असल्याने दोन्ही गटाकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्याने अनेक मातब्बरांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत. मात्र अर्ज माघारीच्या तारखेनंतर अनेक उमेदवारांचे रुसवे, फुगवे काढून एकसंध लढत देण्यावरच यशाची गणिते अवलंबून आहेत. वाड्यावस्त्यांवरील इच्छा-अपेक्षांचा, भावकी-भावकीतील वर्चस्वाचा योग्य मेळ घालूनच निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे.
या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना मानणारा गट हा माथाडी नेत्यांच्या पाठीशी आहे. गावपातळीवरील राजकारणात सेनेचा गट माथाडी नेत्यांचे नेतृत्व मानत असल्याने नरेंद्र पाटील व जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील यांचे पारडे जड झाले आहे. आ. नरेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन व रमेश पाटील यांनी गावात तळ ठोकून आखलेली रणनीती महिला आघाडी सांभाळणार्‍या प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्राची पाटील यांच्यावर संपूर्ण गटाची भिस्त आहे तर काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी विभागाच्या राजकारणातील मुरब्बी हिंदुराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. मंदाकिनी पाटील, आनंदराव पतसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील, युवा संघटन करणारे नितीन पाटील यांनीही लढतीसाठी कंबर कसली आहे. एकंदरीत मंद्रुळकोळे गावच्या दोन्ही पाटलांच्या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: