Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटणच्या कत्तलखान्यात विनापरवाना जनावरांची कत्तल
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: re6
5फलटण, दि. 16 : येथील कुरेशीनगरमधील जुन्या कत्तलखान्यावर फलटण पोलिसांनी कालरात्री अचानक टाकलेल्या धाडीत 21 जनावरे आणि 70 ते 80 जनावरांची मुंडकी आढळून आल्याने बंद करण्यात आलेल्या या कत्तलखान्यात विनापरवाना जनावरांची कत्तल सुरू असल्याचे उघडकीस आले असून हा कत्तलखाना केवळ कागदावरच बंद असल्याचे दिसून आले आहे.
फलटण शहर पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार कुरेशीनगर येथील नगरपालिका शाळेच्या पाठीमागील जुन्या कत्तलखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक दळवी, प्राणी कल्याण अधिकारी यतींद्र जैन व अन्य अधिकार्‍यांनी मंगळवार, दि. 16 रोजी रात्री 12.40 च्या सुमारास धाड टाकली असता या ठिकाणी 21 जनावरे आणि मारलेल्या जनावरांची मुंडकी आढळून आली. या प्रकरणी इम्तियाज मेहबूब बेपारी(रा. कुरेशीनगर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य काहीजण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. या कत्तलखान्यात 21 गोवंशीय जनावरे आढळून आली. त्यामध्ये गावठी गायी, खिलार गाई, जर्सी गाई, एक जर्सी बैल यांचा समावेश   असून ती या कत्तलखान्यात डांबून ठेवण्यात आली होती. त्यांची किंमत 1 लाख 10 हजार आहे. ही जनावरे पोलिसांनी ताब्यात घेवून जाधववाडी, ता. फलटण येथे ठेवली आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी नितीन दिलीप चतुरे यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: