Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
साप येथील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: re5
5रहिमतपूर, दि. 16 : साप, ता. कोरेगाव येथे नाल्यातील पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये गेल्याने 40 जणांना गॅस्ट्रोसदृश साथीची लागण झाली होती. जुलाब, उलट्या होऊ लागल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अधिकार्‍यांची तत्परता व डॉक्टरांनी वेळेत केलेल्या उपचारांमुळे साथ आटोक्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, गॅस्ट्रोची लागण झालेल्या मारुती रावणधर बुधावले व किशोर सुरेश दाभाडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. दि. 13 व 14 मे रोजी लागण झाल्यानंतर काही रुग्ण जिल्हा रुग्णालय, रहिमतपूर, वाठार प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. यातील काही रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत तर दहा-बारा रुग्णांवर ग्रामपंचायत कार्यालयातच मंगळवारी रात्री उशीरापर्यंत उपचार सुरू होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोई यांनी गावात येऊन रुग्णांची विचारपूस केली व परिस्थितीचा आढावा घेतला.  
रुग्णांवर उपचार करणारे डॉ. एस. एम. पवार, डॉ. पागे, डॉ. गायत्री पाटील, डॉ. नर्मदा माने यांना व वाठार (किरोली), रहिमतपूर, तडवळे आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी सूचना केल्या. ज्या नाल्यातील दूषित पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये आले होते, त्या वॉर्ड 1 व 2 मधील फुटलेल्या पाईपची गळती ताबडतोब काढण्यास सांगितले. गावातील पाण्याची टाकी साफ करण्याबरोबर पाणी उकळून पिण्याच्या आणि पिण्याचे पाणी टँकरने पुरविण्यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना सूचना केल्या. त्यांची तत्परतेने अंमलबजावणी झाल्याने ही साथ आटोक्यात आली आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: