Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीरमध्ये ‘हाय अलर्ट’ वीस दहशतवाद्यांची घुसखोरी
ऐक्य समूह
Saturday, June 02, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
5श्रीनगर, दि. 1 (वृत्तसंस्था) : पाकव्याप्त काश्मीरमधून 20 दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त असून सुरक्षा दलांवर मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात अतिसतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. आगामी काही दिवसांत लष्कराच्या तळांवर ’हिट अँड रन’ पद्धतीने आत्मघाती हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचरांनी दिल्यानंतर भारतीय लष्कर सावध झाले आहे. सुंजवान आणि पठाणकोट येथील हल्ल्यांपासून धडा घेत यावेळी कोणतीही चूक न करण्याचा निर्धार लष्कराने केला आहे. गस्ती पथके, चौक्यांसह लष्कराच्या महत्त्वाच्या तळांवर सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.     
घुसखोरी केलेले दहशतवादी मसूद अझरच्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी एकाच वेळी घुसखोरी करण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. रमजानच्या पवित्र महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवण्यात येत असल्याची घोषणा भारत सरकारने केली आहे. मात्र, भारताच्या या एकतर्फी शस्त्रसंधीनंतरही सीमेवर दहशतवादी कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी जवानांच्या गस्तीपथकावर हल्ला करणार्‍या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: