Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘नीट’ परीक्षेत कल्पनाकुमारी ‘टॉपर’
ऐक्य समूह
Tuesday, June 05, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: na2
नांदेडचा कृष्णा अगरवाल देशात सातवा
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सीबीएसईच्यावतीने 7 मे रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत बिहारच्या कल्पनाकुमारीने 691 गुण (99.99 पर्सेंटाइल) मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला. नांदेडच्या कृष्णा अगरवालनेही या परीक्षेत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले असून त्याने देशपातळीवर सातवा क्रमांक मिळवला आहे.
सीबीएसएईतर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्‍नपत्रिका समान नसल्याने ही परीक्षा रद्द करून पुन्हा नव्या प्रश्‍नपत्रिकेसह फेरपरीक्षा घेण्याची मागणी तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी केली होती. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने ‘नीट’चा निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती.   
या निर्णयाविरोधात सीबीएसईसीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करताना ‘नीट’च्या निकालावरील स्थगिती उठवली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीएसईने परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी 12.30 वाजता जाहीर केला. या परीक्षेसाठी देशभरातून 13.36 लाख विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. देशभरातील 136 शहरांमध्ये 2,225 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, मराठी, ओरिया, बंगाली, आसामी, तेलगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये घेण्यात आली होती. नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 12.69 लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली होती. त्यापैकी 7 लाख 14 हजार 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत 720 पैकी 691 गुण मिळवून बिहारच्या कल्पनाकुमारीने देशात अव्वल स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी देशपातळीवर पहिल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यात नांदेडच्या कृष्णा अगरवालने देशात सातवा, गुंजन गट्टानीने 21 वा
आणि लोकेश मांडलेने 37 वा क्रमांक मिळवला आहे. आता देशपातळीवरील (ऑल इंडिया कोटा) 15 टक्के जागांसाठी
समुपदेशन सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यांच्या कोट्यातील
85 टक्के जागांसाठी राज्यस्तरावर स्वतंत्रपणे समुपदेशन करण्यात येणार आहे. उमेदवारांना या समुपदेशन वर्गासाठी स्वतंत्र नावनोंदणी करावी लागणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: