Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्राचे साखर उत्पादकांसाठी 8000 कोटींचे पॅकेज?
ऐक्य समूह
Wednesday, June 06, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : ऊस उत्पादक शेतकर्‍यांची थकीत देणी भागवण्यासाठी केंद्र सरकार साखर उद्योजकांसाठी 8 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर केंद्र सरकारने या हालचाली सुरू केल्या आहेत.
देशभरातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची 22 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यातील जवळपास अर्धी थकबाकी ही उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांची आहे. केंद्राच्यावतीने जाहीर करण्यात येणार्‍या पॅकेजनुसार 30 लाख टन उसांचा बफर स्टॉक असणार आहे.   
त्यासाठी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा होणार आहे. बफर स्टॉकसाठी किमान हमी भाव ठरवण्यात येणार आहे.
साखरेचे किमान दर ठरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या साखरेसाठी प्रतिकिलो 29 रुपये दर ठेवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, साखर उद्योजकांकडून हा दर प्रतिकिलो 34 ते 35 रुपये किलो करण्याची मागणी करण्यात येत आहे. साखरेचे किमान भाव ठरवण्यासोबत दर नियंत्रित ठेवणे आणि वर्षभर साखरेचा पुरवठा व्यवस्थित होईल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पश्‍चिम उत्तर प्रदेशचा भाग हा ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा आहे. याच भागात कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात भाजपचा पराभव झाल्याने भाजपने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज जाहीर करणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: