Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दीपक मसुगडेसह टोळीवर मोक्काची कारवाई
ऐक्य समूह
Thursday, June 07, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 : पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमार करत दहशत घालून जबरी चोरी करणार्‍या दीपक नामदेव मसुगडे याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक वर्षात तब्बल 10 जणांच्या टोळीला मोक्का लावून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या टीमने विक्रमच केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुंड दीपक मसुगडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दि. 16 एप्रिल 2018 रोजी रणणसिंगवाडी, ता.खटाव  येथे तक्रारदार हे सायकलवरून निघाले होेते. त्यावेळी संशयित दीपक मसुगडे व त्याच्या टोळीने तक्रारदार यांना रस्त्यात अडवले. बेदम मारहाण करून संशयितांनी तक्रारदार यांच्या खिशातील रोख 10 हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने  चोरून तेथून पळ काढला. तक्रारदार यांनी जखमी अवस्थेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पुसेगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून त्यांनी दीपक मसुगडे याच्यासह टोळीविरुद्ध तक्रार दिली. पुसेगाव पोलिसांनी संशयितांना अटक करून अधिक चौकशी केली असता त्यांनी अनेक  ठिकाणी लूटमार केल्याची कबुली दिली. याशिवाय टोळीच्या माध्यमातून स्वत:च्या फायद्याकरिता चोरी, घरफोडी, लूटमार, दरोडा, गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न  अशी अनेक गंभीर कृत्ये त्यांनी केली आहेत. संशयितांविरुद्ध दहिवडी, फलटण ग्रामीण, पुसेगाव, सातारा तालुका या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दीपक मसुगडे या टोळीची परिसरात दहशत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुसेगाव पोलिसांनी या टोळीचा मोक्काचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवला. हा प्रस्ताव पुढे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला असता त्यांनी तो मंजूर केला. पोलीस उपअधीक्षक यशवंत काळे हे मोक्काचा पुढील तपास करत असून टोळीची स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेतली जात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: