Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपचे 3 आमदार निवडून आणण्याची सुपारी घेतली काय?
ऐक्य समूह
Thursday, June 07, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: lo3
आ. जयकुमार गोरे यांना आ. आनंदराव पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकार्‍यांचा सवाल
5सातारा, दि. 6 : सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदाराने भाजपचे 3 आमदार निवडून आणण्याची सुपारी घेतली आहे काय, असा सवाल करत हेकेखोर आमदार, दबाव टाकून, राजकीय डाव टाकून आपल्याला हवे तसे घडवून आणण्याचा प्रयत्न करणारा आमदार, अशी शेलकी विशेषणे लावत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, उपकार करणार्‍यावर अपकार करण्याची आपली सवय बदला. ज्यांनी उपकार केला त्यांची जाण ठेवा नाहीतर भविष्यकाळ आपणास माफ करणार नाही. काँग्रेस पक्षाशी व पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी प्रामाणिक रहा, असा योग्य सल्ला जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तुम्हाला देत आहोत. काँग्रेस पक्ष व पृथ्वीराज चव्हाण तुमच्या पाठीशी नसतील तर तुमचे काय होईल, असा सवालही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे आणि जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. धनश्री महाडिक यांनी आ. जयकुमार गोरे यांना विचारला आहे.
या संदर्भात आपल्या स्वाक्षरीनिशी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी संदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारित आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यास बांधील राहण्याचे बंधन काँग्रेसच्या सच्चा व निष्ठावंत कार्यकर्त्यांवर निश्‍चितपणे आहे. स्वत:च्या माण-खटाव मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आघाडीचा निर्णय पाळला पाहिजे आणि जर पाळला नाही तर भाजपचे तीन आमदार निवडून येतील, असे म्हणणे म्हणजे दबावाचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रकार आहे. त्यातून आपले मनोइच्छित राजकारण साधण्याचा राजकीय डाव आहे. आघाडी धर्मानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी राजकारणात काही संकेत पाळावेत असे जर आपणास वाटत असेल... तर स्वत:च्या पक्षातील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत खटाव व कोरेगाव तालुक्यात आपण काय भूमिका घेतली होती... याचे आत्मपरीक्षण केल्यास बरे होईल.
आपणास फार मोठा जनाधार आहे?
तुमची डीएनए चाचणी केली तर काय बाहेर पडेल, खरे काय आणि खोटे काय? पक्षाशी किती प्रामाणिक आहात याकडे पाहिले तर माण-खटाव पंचायत समितीत काय झाले? असे सातत्याने पत्रकार परिषदा घेवून वादग्रस्त वक्तव्ये करून जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देवून स्टंटबाजी करण्याची आपली जुनी स्टाईल आहे आणि ती सर्वांना माहिती झाली आहे. काँग्रेस पक्ष व पृथ्वीराज चव्हाण आपल्या पाठीशी नसले तर आपले काय होईल याचेभान असावे. हिंमत असेल तर अपक्ष उभे रहावे.
गत जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यातील नेत्यांवर दबाव टाकून कोरेगाव, खटाव, माण तालुक्यात मी म्हणतो त्यालाच तिकिटे दिली पाहिजेत. मी सांगेन तोच उमेदवार असला पाहिजे अन्यथा सर्व मतदारसंघात मी काँग्रेस पक्षाचे चिन्ह न घेता निवडणुका लढवेन, असा दबाव टाकून आपल्या मर्जीतल्या समर्थक उमेदवारांना जिल्हा परिषदेची तिकिटे देण्याचा हट्ट धरून वेगळी चूल मांडली. कोरेगाव पंचायत समिती ताब्यात असणारी घालवली. हे कोणाचे पाप आहे?   
कोरेगाव, खटाव व माण तालुक्यात एकूण 16 मतदारसंघांपैकी आपण व्यक्तिकेंद्रित हट्टाने ज्यांना तिकिटे आणली त्यापैकी फक्त 3 च उमेदवार निवडून आले हाच काय आपला मोठा जनाधार?, कोरेगाव नगरपंचायत झाली. किरण बर्गे यांच्या पत्नी नगरसेविका झाल्या. त्या नगराध्यक्ष झाल्या नाही म्हणून किरण बर्गेचे ग्रामीण भागात मतदान आणून जिल्हा परिषदेचे तिकीट देण्यास श्रेष्ठींना भाग पाडले. जिल्हा परिषद निवडणुकीच्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजित देशमुख होते. त्यानंतर तो मतदारसंघ महिला राखीव झाला. त्यामुळे रणजित देशमुख यांच्या पत्नीस उमेदवारी द्यावी, असे कै. डॉ. पतंगराव कदम, तत्कालीन संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी आग्रह धरला. परंतु त्यांचा शब्द आपण पाळला नाही याचेउत्तर कधी तरी द्यावे लागेल. नेत्यांचा शब्द पाळण्याची सवय असावी लागते याचे उत्तर काळ देईल. आपल्या या दबाव तंत्रामुळे कोरेगाव पंचायत समितीतील हातातील सत्ता गेली याला जबाबदार कोण, असा सवाल केला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीबाबत सातत्याने आरोप-प्रत्यारोप करावयाचे व जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये दुफळी निर्माण करायची हाच काय तो आपला एकमेव उद्योग सध्या सुरू आहे. 2009 च्या विधानसभेला राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी होती. आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आपण निवडून यावे व काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातून एका आमदाराची राजकीय शक्ती मिळावी म्हणून सातारा, कराड, कोरेगाव, वाई, फलटण या तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपणाला माण तालुक्यात येऊन रात्रंदिवस आपण निवडून येण्यासाठी काम केले आणि आपणास आमदार केले. त्याची जाण व परतफेड आपण कोणत्या पद्धतीने करत आहात? आपल्या आमदार होण्यामागे काँग्रेसच्या नेत्यांचे व असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान होते. परंतु त्याचा पद्धतशीर विसर आपणास पडलेला आहे. कृपया पाठीमागील घटनांचे सिंहावलोकन केले तर बरे होईल. आपल्या हेकेखोरपणामुळे व मी पणामुळे काँग्रेस पक्षातील जनाधार व शक्ती असलेले कार्यकर्ते उदाहरणार्थ सुरेंद्र गुदगे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई काँग्रेस पक्षातून का बाहेर पडले, याचेही आत्मचिंतन आपण केले तर काँग्रेस पक्षावर आपले उपकार होतील. स्व. शंकरराव जगताप यांच्यासमवेत सुरेंद्र गुदगे यांच्या पत्नीस पक्षप्रतोद करण्याचा निर्णय झाला. तेथे त्यांच्याघरी आपण जेवणही घेतले व दुसर्‍या दिवशी त्यास विरोध केला. मी म्हणेल ते माझ्या मतदारसंघात करावे, असा दबाव पक्षश्रेष्ठींवर आणला आणि त्यांना पक्षप्रतोद पद मिळू दिले नाही. 2007 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 22 सदस्य निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील हेच होते ना?, राजकारणामध्ये चढ- उतार कायम असतात. काँग्रेस पक्षाची गेली 70 वर्षे देशामध्ये निर्विवाद सत्ता होती. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. त्याला काँग्रेसचे जिल्हा नेतृत्व कारणीभूत ठरते का?, स्व. प्रेमिलाताई चव्हाण व आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 1978 ते आजपर्यंत काँग्रेस पक्षाशी युवक काँग्रेस व सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाशी व चव्हाण घराण्याशी एकनिष्ठ राहिले. ज्यांना कोणाला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे आहे त्यांनी लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्षाच्या घटनेप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्ष व्हायला कोणाचीही हरकत नाही. तसा यापूर्वी काही लोकांनी प्रयत्न केला होता. परंतु ते त्यांना जमले नाही. जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्याजवळ 400 सभासद नोंदणी पुस्तके दिली. प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासमोर आपण खोटे बोललो. त्यावेळी पुस्तके दिल्याचा जिल्हाध्यक्ष यांनी पुरावा दिला. प्रदेशाध्यक्षांच्या लक्षात आल्यानंतर  प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांना 500 पुस्तके देण्याच्या सूचना दिल्या तरी आपण पुस्तके घेतली नाहीत. सभासद केले नाही याची जबाबदारी कोणाची आहे. त्यामुळे आपण प्रदेेश प्रतिनिधी झाला नाही आणि याचे खापर जिल्हाध्यक्ष यांच्यावर कशाला ठेवता. काँग्रेस कशी वाढते याचे भानही राहिले नाही. पक्ष निरीक्षक जिल्हा काँग्रेस येथे आले. त्यावेळी मी आमदार आहे परंतु काँग्रेसमध्ये आहे काय असा सवाल आपण केला होता. याचे उत्तर तुम्ही काँग्रेसमध्ये आमदार म्हणून आहात परंतु काँग्रेसमध्ये निवडणूक प्रक्रिया असते. तुम्ही सभासद केले का? स्वत: सभासद आहात काय असा सवाल केला. त्यावेळी तुम्ही निरुत्तर झाला.  मदनदादा भोसले हेही निवडणुकीने अध्यक्ष झाले होते. पक्षशिस्त पाळणे याचे भान आपल्याला कधीच राहिले नाही. जातीयवादी भाजपला सत्तेतून कायमचे हद्दपार करायचे हे काँग्रेस पक्षाचे मुख्य ध्येय व उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करायचे असल्यास येणारा काळ व 2019 च्या निवडणुकीसाठी मिक्षपक्षाने व स्वत:च्या पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेससाठी काम करावे असे वाटत असेल तर सातत्याने पत्रकार परिषदा घेवून स्वपक्षातील नेत्यांवर बेताल आरोप करणे व निरर्थक बदनामी करणे आपण थांबवले तर ते तुमच्यासाठी भले होईल असा सल्ला आहे. जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील असताना त्यांच्या नेतृत्वाखाली तुमचे मोठे भाऊ अंकुश गोरे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. त्यानंतर सोमनाथ भोसले यांचे बंधू युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचा राजीनामा घेवून आपणास युवक काँग्रेसचे अध्यक्षपद दिले. आपली राजकीय कारकीर्द सुरू झाली कारण आपणास युवक काँग्रेसचे अध्यक्षपद दिले, जिल्हा परिषदेचे तिकीट दिले म्हणून. पृथ्वीराज चव्हाण, आनंदराव पाटील यांनी सभा घेतली म्हणून तुम्ही निवडून आला. केवळ तुमचे बंधू अंकुश गोरे यांच्यामुळे आपला राजकारणात प्रवेश झाला याचे भान आपणास राहिले नाही. आपण आपल्या कुटुंबाशी कसे वागायचे हे ठरवा व काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहिला तरच आपले भविष्य चांगले राहील याची जाणीव ठेवा. आपल्या बंधूचे व आनंदराव पाटील यांचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे आपली राजकीय कारकीर्द सुरू झाली याचा आपणास विसर पडलेला दिसत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: