Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ओटीपीद्वारे गेलेले पैसे पोलिसांमुळे मिळाले परत
ऐक्य समूह
Friday, June 08, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 7 : मोबाईलवरील ओटीपी क्रमांक दिल्यामुळेएकाच्या बँक खात्यातील 42 हजार रुपये लांबवून फसवणूक झाली होती. मात्र  सातारा सायबर पोलिसांमुळे त्यातील 31 हजार रुपये परत मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, बँक खात्याची कोणतीही  माहिती व ओटीपी क्रमांक कोणालाही देवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याबाबत अमोल पाटील (जाशी-पळशी ता. माण) यांनी तक्रार दिली. अज्ञाताने त्यांना फोन करून मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक घेतला व त्याद्वारे 42 हजार रुपयांची फसवणूक झाली. ही बाब तक्रारदार अमोल पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ ही गोष्ट सातारा येथील सायबर पोलीस ठाण्यात कळवली. पोलिसांनी तत्काळ मोबाईलवरील मेसेज, बँकेची स्टेटमेंट घेवून त्याद्वारे तपास केला. एका कंपनीकडून खरेदीद्वारे फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी कंपनीला फोन करून तत्काळ तो व्यवहार रद्द करण्यास सांगितले. अशाप्रकारे पोलिसांमुळे मूळ रकमेतील 30 हजार 571 रुपये परत करण्यात आले.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन कदम, पोलीस हवालदार शंकर सावंत, सचिन पवार, निखिल जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: