Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अबू सालेमला सात वर्षे तुरुंगवास
ऐक्य समूह
Friday, June 08, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na1
खंडणी प्रकरणी दिल्ली न्यायालयाचा निकाल
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : खंडणी प्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला सात वर्षे कारावसाची शिक्षा दिल्लीतील सत्र न्यायालयाने गुरुवारी सुनावली. सध्या मुंबईतील ऑर्थर रोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सालेमचा पाय आणखी खोलात गेला आहे.
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आणि 1995 मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्या प्रकरणात सालेम दोषी असून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने 2002 मध्ये दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागातील व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी दाखल असलेल्या खटल्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. दिल्लीतील सत्र न्यायालयाने सालेमला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी 26 मे रोजी सालेमला दोषी ठरवण्यात आले होते.
बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांची 1995 मध्ये हत्या आणि 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेम दोषी ठरला आहे. त्यात त्याला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. पोर्तुगाल सरकारने सालेमचे
भारताकडे प्रत्यार्पण केले होते. या प्रत्यार्पण करारानुसार सालेमला भारतात कोणत्याही गुन्ह्याबद्दल फाशी देता येणार नाही.
या कराराच्या आधारेच लिस्बन न्यायालयाने सालेमच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती. सालेमला फाशीची शिक्षा किंवा
25 वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा न देण्याचे भारत सरकारने मान्य केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: