Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभा, विधानसभा स्वबळावरच लढणार
ऐक्य समूह
Friday, June 08, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: mn4
अमित शहांच्या भेटीनंतरही संजय राऊत यांची स्पष्टोक्ती
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजप अध्यक्ष अमित शहा यांची काल काय चर्चा झाली, याची कल्पना नाही; पण आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले.
‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानांतर्गत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली होती. या दोघांमध्ये तब्बल दोन तास बंदद्वार चर्चा झाली होती. या भेटीमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील दुरावा कमी होऊन आगामी लोकसभा निवडणुकीत युती होणार, अशी चर्चा सुरू झाली असतानाच खा. संजय राऊत यांनी आज युतीच्या चर्चेतील हवा काढली.
अमित शहा काल ‘मातोश्री’वर आले होते. भाजप अध्यक्ष आणि शिवसेना प्रमुख यांच्यात सुमारे पावणेदोन तास विविध विषयांवर चांगली चर्चा झाली. आपण पुन्हा भेटू, असे अमित शहा म्हणाले. या भेटीबाबात आणखी काही सांगण्यासारखे माझ्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांची आज पालघरमध्ये सभा होणार असून कदाचित तिथे ते आपली मते मांडतील. मात्र, आम्हाला अमित शहांचा अजेंडा माहिती आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा प्रस्ताव संमत केला असून या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असे संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
विधानपरिषद निवडणुकीत युती नाही
अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीनंतर भाजपने आज मुंबई पदवीधर मतदारसंघातून अ‍ॅड. अमित महेता यांची उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेने आधीच संजय पोतनीस यांची उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना आमनेसामने येणार आहेत. कोकण पदवीधरमध्ये भाजपने निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहीर केली असताना शिवसेनेनेही माजी महापौर संजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
उद्धव यांचे भाजपवर पुन्हा टीकास्त्र
दरम्यान, पालघर येथे आज झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीबाबत बोलणे टाळले; परंतु ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना शिवसेनेने पालघरमध्ये घाम फोडला, असा टोला त्यांनी लगावला.
पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असतानाही प्रथमच निवडणूक लढवून शिवसेनेने अडीच लाख मते घेऊन ताकद दाखवून दिली. पालघरमधील शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उद्धव ठाकरे येथे आले होते. वनगा कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर झालेल्या सभेत उद्धव यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला. अमित शहांच्या भेटीनंतरही आता युती शक्य नसल्याचे संकेतही त्यांनी दिले. पालघरमध्ये नैतिक विजय आपलाच आहे, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी पालघरमधून श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. श्रीनिवास यांच्यावर पालघर मतदारसंघाच्या संघटकपदाची जबाबदारी सोपवत असल्याची घोषणाही त्यांनी केली.
पैसे वाटणार्‍यांवर गुन्हा का नाही?
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. पालघरमध्ये पैसे वाटताना काही जणांना शिवसैनिकांनी पकडले होते. मात्र, त्यांच्यावर अद्याप कारवाई का नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: