Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही : छगन भुजबळ
ऐक्य समूह
Monday, June 11, 2018 AT 11:36 AM (IST)
Tags: mn1
राष्ट्रवादी कधीच सोडणार नाही; शिवसेनेने तिसर्‍या आघाडीत सामील व्हावे : खा. पवार
5पुणे, दि.10 (प्रतिनिधी) : दोन वर्षांनंतर आपण जेलमधून बाहेर आल्यानंतर आपल्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सर्व पक्षांचे नेते भेटून गेल्यामुळे मीडियाबरोबरच राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. भुजबळ कोठे जाणार, अशीच चर्चा सुरू झाली होती. आता राष्ट्रवादीचे स्टेज असल्यामुळे मोकळेपणाने बोलणार आहे. वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही. अडीच वर्षांपूर्वीच माझ्यावर हल्लाबोल झाला. एकाच ठिकाणी अनेक वेळा धाडी टाकण्यात आल्या परंतु मिळाले काहीच नाही. पण सांगताना बरेच काही सांगण्यात आले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची रविवारी पुण्यात सभेने सांगता झाली. त्यावेळी जेलमधून सुटून आल्यानंतर प्रथमच स्टेजवर आलेले छगन भुजबळ यांनी फटकेबाजी करून आपल्यात अजून तोच जोश असल्याचे दाखवून दिले. या सभेला पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, आ. अजित पवार, आ. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र सदनाचा कंत्राटदार छगन भुजबळ यांनी नेमला नाही आणि शिफारसही केली नाही. न्यायदेवतेमुळे तुमच्यासमोर मला बोलता येत आहे. न्यायदेवतेवर माझा विश्‍वास होता आणि आहे. मी माझी बाजू मांडून निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि पवार साहेबांचे प्रयत्न यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. मला भेटायला आलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
ते पुढे म्हणाले, नोटाबंदीमुळे सगळीकडे शांतता आहे. दहशतवाद संपला, कोठेही गोळीबार होत नाही.  त्याचबरोबर पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट झालीत अशी चार शहरे यांनी सांगावीत, चार जिल्हे सांगावेत ज्यांचा विकास सांगावा. चार गावे हागणदारीमुक्त झालेली दाखवावीत, साखरवाला, दुधवाला, टोमॅटोवाला, कांदावाला रडत आहेत, हे कसले अच्छे दिन? आधी आत्महत्या गावात व्हायच्या आता मंत्रालयासमोर होतात. सगळ्यांना अच्छे दिन आलेत, सगळे रडत आहेत, पाकची साखर गोड झाली आहे.
मराठा या महाराष्ट्रात सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. ओबीसी समाजाला आरक्षण पवार साहेबांमुळेच मिळाले. मी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात कधीच नव्हतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रस्तावाला मी कधीच विरोध केलेला नाही. जाणीवपूर्वक माझी प्रतिमा मराठा समाजाच्या विरोधात बनवली गेली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी समाजाला घेऊन मी रस्त्यावर यायला तयार आहे. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
शिवसेनेने तिसर्‍या आघाडीत
सामील व्हावे : खा. पवार
नोटाबंदीने सामान्य नागरिक, आया-बहिणी भिकेला लागल्या आहेत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढत आहेत. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी अजूनही झालेली नाही. देशात कुणीही सुखी नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.             
भाजपचा जर पराभव करायचा असेल तर शिवसेनेने तिसर्‍या आघाडीत सामील व्हावे, असे आवाहन करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांची बेरीज झाली तर भाजपचा पराभव निश्‍चित असल्याचा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी महात्मा फुलेंच्या पगडीचा वापर करण्याची सूचना करत छगन भुजबळ यांना फुलेंची पगडी घातली.
सत्तेचा मस्तवालपणा राष्ट्रवादीने कधी दाखवला नाही, असे सांगत खा. पवार यांनी भाजपचे पालघरचे यश हे खरे नव्हे. भाजपसोडून देशातील सर्व पक्षांनी एकत्र यावे. आपण सर्वांनी जाऊन निवडणूक आयोगाला भेटून इव्हीएम बंद करून जुन्या पद्धतीने निवडणुका घेण्याची विनंती केली पाहिजे, अशी मागणी केली.
महाराष्ट्र सदन ही दिल्लीतील सर्वांत सुंदर वास्तू
भुजबळांबाबत बोलताना ते म्हणाले, छगन भुजबळांनी काय गुन्हा केला होता. महाराष्ट्र सदन ही आज दिल्लीतील सर्वांत सुंदर वास्तू आहे. आज सर्वच जण अगदी सरकारी कार्यक्रमही महाराष्ट्र सदनात पार पडतात. अशी सुंदर वास्तू उभारणार्‍या व्यक्तीला तुम्ही तुरूंगात टाकता?
आता हे नेते धमकीचे पत्र आल्याचे कारण सांगत आहेत. धमकीचे पत्र आल्याचे कोणी माध्यमांना सांगत नाहीत. पोलिसांना सुरक्षेबाबत सूचना केल्या जातात, असे सांगत धमकी प्रकाराबाबत शंका उपस्थित केली. देशाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्रित यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांना वाण नाही पण
गुण लागला : अजित पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशात फिरत असतात. आता मुख्यमंत्रीही परदेशात गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही वाण नाही पण गुण लागला, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
अजित पवार म्हणाले, चार वर्षांत सरकारने कसे वाटोळे केले याची आपण पुस्तिका काढत आहोत. हजारो कोटी बुडवून अनेकजण परदेशात पळून गेले. सतत संप होत आहेत, याबद्दल अगोदर तोडगा का काढत नाही. गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी संपावर आहेत. हे राज्यकर्ते कशासाठी काम करतात याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
देशभरातील वातावरण बदलत आहे. ही पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोलची सांगता सभा असली तरी यापुढे आंदोलन सुरूच राहणार आहे. एवढ्या समस्या असताना माधुरीला भेटून काय होते? शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजे. आपल्याला विदर्भात विजय मिळाला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आपला गढ आहे, त्यामुळे या ठिकाणी आपले वर्चस्व राहिलेच पाहिजे.
सत्तांतरात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल : मुंडे
येत्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. या सत्तांतारात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष असेल.  सबका साथ सबका विकास या भाजपच्या घोषणेवर मोठी टीका झाल्याने साफ नियत साफ विकास अशी जाहिरात आता भाजप करत आहे. परंतु आश्‍वासने देऊन ती पूर्ण न केल्याने मोदींची साफ नियत नसल्याचे दिसून येते. मोदी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे म्हणाले होते. परंतु 15 पैसेसुद्धा कोणाच्या खात्यात आले नाहीत, असे विधान राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: