Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात
ऐक्य समूह
Monday, June 11, 2018 AT 11:39 AM (IST)
Tags: re1
आंबवडे येथे बस पलटी, 15 जण जखमी
5पन्हाळा, दि. 10 (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील आंबवडे (ता. पन्हाळा) गावाच्या कमानी शेजारी रविवारी दुपारी 2.30 च्या सुमारास खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सी. पी. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची फिर्याद श्रीराम अरविंद कुलकर्णी, रा. सातारा यांनी पोलिसात दिली. त्यानुसार घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली आहे. सर्व जखमी सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलचे 1977 च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थी आहेत.
 याबाबत अधिक माहिती अशी, की सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी खाजगी बसने (क्र. एम.एच.11 टी-9797) पर्यटनासाठी गेले दोन दिवस कोल्हापूर येथे आले होते. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, जोतिबा आणि पन्हाळा येथे भेट देवून बस कोल्हापूर-रत्नागिरी महा-मार्गाने वाठार मार्गे परत साताराकडे येत होती. या गाडीचा वेग जास्त होता. आंबवडे येथील कमानीच्या धोकादायक वळणावर वेगातील बसवरील चालकाचा (नाव माहित नाही) ताबा सुटल्याने बस महामार्गाच्या बाजूस असणार्‍या पोवार यांच्या शेतात पलटी झाली. बस पलटी झाल्याची बातमी आंबवडे गावकर्‍यांना कळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.  त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. तर जखमींना कोल्हापूर येथे हलविण्यासाठी जोतिबा, पन्हाळा येथून 108 अ‍ॅम्ब्युलन्सला प्रचारण करण्यात आले होते. अपघातानंतर बसचा चालक फरार झाला आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून वाहनाचा अपघात होण्यास कारणीभूत ठरणे, वाहनातील प्रवाशांना जखमी करणे, अपघाताची वर्दी न देता पळून जाणे यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक फौजदार कोळी, हवालदार बगाड तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: