Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी तुकडी तयार करणार : संभाजी भिडे
ऐक्य समूह
Monday, June 11, 2018 AT 11:53 AM (IST)
Tags: mn3
5अहमदनगर, दि. 10 (वृत्तसंस्था) : रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी ‘हिंदवी स्वराज्य खडा पहारा’ तुकडी तयार करणार आहे. रायगडावर शिवछत्रपतींच्या सुवर्णसिंहासनासाठी 1384 किलो सोने लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून दोन हजार धारकर्‍यांनी निधी गोळा करायचा आहे. आपण सरकारकडे निधी मागणार नाही, असे प्रतिपादन  श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले.
अहमदनगरच्या टिळक रोड येथे रविवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला परवानगी द्यायला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे कडकोट बंदोबस्तात ही सभा पार पडली.
यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले, की या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी तयार करण्यात येणार्‍या दोन हजार धारकर्‍यांचा समावेश असेल व ते रोज गडावर पहारा देतील.  सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकर्‍यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय सुरू आहे, म्हणून टीका करतील. त्यामुळे तूर्तास या ठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे.
ते पुढे म्हणाले, बारा ज्योतिर्लिंग जपणारे शिवछत्रपती व संभाजी महाराजांची समाधी ज्योतिर्लिंगच आहे. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांचे वजन 64 किलो होते. तेवढ्याच वजनाची मूर्ती सुवर्णसिंहासनावर बसविण्यात येईल. अनेकांनी विविध माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या जीवनाचे मर्म उलगडून कोणी सांगू शकले नाही. हिंदवी स्वराज्य हेच त्यांच्या जीवनाचे मर्म आहे. हिंदुस्थान विश्‍वाचा ‘बाप’ झाला पाहिजे, हे त्यांनी आपल्याला दिलेले व्रत आहे. शहाजी महाराजांनी शिवरायांना दिशा व ध्येय दिले. हिंदवी स्वराज्य व्हावे, असे शहाजीराजे व जिजाबाई यांच्या मनात होते. त्यामुळे त्यांनी तसे संस्कार शिवाजी महाराजांना दिले.
याशिवाय, अहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ असा करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगर शहराच्या नामांतराचा प्रस्तावच त्यांनी सभेत मांडला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: