Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न
ऐक्य समूह
Tuesday, June 12, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : धुळे महापालिकेचे हंगामी कामगार बबन झोटे यांनी सोमवारी दुपारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धुळे महापालिकेतील नोकर भरती घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही. त्यामुळे झोटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला; पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
धुळ्यातील बबन यशवंत झोटे यांनी 3 एप्रिल रोजी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र दिले होते. 1989 मध्ये धुळे महापालिकेत झालेल्या नोकर भरतीतील घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा आपण आत्महत्या करू. त्याला राज्य सरकार व धुळे महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. दुपारी बाराच्या सुमारास झोटे हे मंत्रालयाच्या ‘जनता जनार्दन’ गेटवर आले. तेथे त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले; पण बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: