Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मान्सून रेंगाळणार....!
ऐक्य समूह
Tuesday, June 12, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: mn1
ईशान्य भारतात अतिवृष्टीचा इशारा
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : केरळमध्ये वेळेआधी दाखल झाल्यानंतर मजल दरमजल करत महाराष्ट्रात आगमन झालेला नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून येत्या गुरुवारनंतर आठवडाभर ते दहा दिवसांची विश्रांती घेण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, त्याचा मान्सूनच्या सरासरीवर परिणाम होणार नाही आणि तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचेल, असे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै यांनी सोमवारी सांगितले.
भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून केरळमध्ये वेळेच्या आधी दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज योग्य ठरवत मान्सून केरळमध्ये दाखल झालादेखील. त्यानंतर मान्सूनची वाटचाल योग्य पद्धतीने होत राहिली. गेल्या आठवड्यात मान्सूनचे महाराष्ट्रातही आगमन झाले. आता पुढील 48 तासांत मान्सून ओडिशाचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा उत्तर-पूर्व भाग, ईशान्येकडील काही राज्ये, पश्‍चिम बंगालचा काही भाग व सिक्कीमपर्यंतच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र, त्यानंतर एक आठवडा किंवा दहा दिवस मान्सून विश्रांती घेईल. त्याची पुढील वाटचाल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ही परिस्थिती वेगळी नाही. मान्सूनच्या बाबतीत असे अनेकदा होते. अर्थात त्यामुळे मान्सूनच्या सरासरीवर किंवा राजधानी दिल्लीत दाखल होण्याच्या वेळेवर काहीही परिणाम होणार नाही. मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात 29 तारखेला दिल्लीत दाखल होईल, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै यांनी सांगितले. मात्र, मान्सूनच्या विश्रांतीच्या काळात ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिवृष्टी होईल, असा अंदाजही पै यांनी वर्तविला आहे. दरम्यान, मान्सूनने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड, पश्‍चिम बंगालचा काही भाग, आसाम व मेघालयाचा काही भाग येथे आधीच धडक मारली आहे, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडला वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि दक्षिणेतील अनेक भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजावरून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना आगामी 24 तास समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, दक्षिण कर्नाटक, केरळ, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड आदी ठिकाणी येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर-पूर्व बंगालची खाडी, बांगलादेश आणि त्रिपुरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: