Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माजी पंतप्रधान वाजपेयी ‘एम्स’मध्ये दाखल
ऐक्य समूह
Tuesday, June 12, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: na1
पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनी केली प्रकृतीची विचारपूस
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान असा लौकिक मिळवणार्‍या अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी सकाळी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुररली मनोहर जोशी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रात्री रुग्णालयाला भेट देऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
93 वर्षीय वाजपेयी हे गेली काही वर्षे आजारी असून त्यांना सोमवारी सकाळी नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले. वाजपेयी यांच्या श्‍वसनमार्गात संसर्ग झाला असून त्यांना मूत्रपिंडाचाही त्रास होत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ‘एम्स’ने रात्री वाजपेयींच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध केले. त्यानुसार रात्री वाजपेयींचे डायलिसीस करण्यात आले. मात्र, वाजपेयींना मूत्रसंसर्ग झाला नसल्याचा आणि त्यांना ताप नसल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला आहे. तपासण्या पूर्ण झाल्यानंतर वाजपेयी यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना लवकर घरी सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदींनी रात्री ‘एम्स’ला भेट देऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी यांनी रात्री साडेसातच्या सुमारास रुग्णालयास भेट देऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी सुमारे 50 मिनिटे रुग्णालयात होते. त्यांनी वाजपेयींच्या नातेवाइकांशी संवाद साधला आणि डॉक्टरांशी
वाजपेयींच्या प्रकृतीविषयी चर्चा केली. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनीही वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते सांयकाळी ‘एम्स’मध्ये गेले होते. वाजपेयी यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांशी राहुल गांधी यांनी चर्चा केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे बर्‍याच काळापासून आजारी आहेत. भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या वाजपेयी यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषविले होते. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान होते. त्यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: