Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंतप्रधानांकडून केवळ श्रीमंतांची चौकीदारी
ऐक्य समूह
Wednesday, June 13, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: mn3
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजप दिसणार नाही : राहुल गांधी
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार म्हणून काम करू, असे जाहीर केले होते; परंतु आज ते केवळ मूठभर धनाढ्य लोकांची चौकीदारी करत आहेत. बँका गरिबांना कर्ज नाकारतात, पण श्रीमंत लोक हजारो कोटींचे कर्ज घेऊन देशातून पळून जातायत. शेतकरी, बेरोजगार तरुण सरकारच्या धोरणांमुळे उद्ध्वस्त झाल्याची जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मुंबईत बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना केली. गुजरातच्या निवडणुकीत भाजप कसाबसा वाचला, कर्नाटकमध्ये हरला आणि येणार्‍या मध्य प्रदेश, राजस्थानच्या निवडणुकीत दिसणारही नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला हजेरी लावल्यानंतर मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या गोरेगाव येथील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. समाजातील कोणताही घटक आज समाधानी नाही. देश केवळ भाषणावर चालत नाही. भरमसाट आश्‍वासने दिली; पण त्यांची पूर्तता न करता शेतकर्‍यांना व गरिबांना भाजपने धोका दिला आहे. शेतकर्‍यांना कर्ज द्यायला बँकांकडे पैसे नाहीत. केवळ श्रीमंतांना कर्ज मिळतात आणि ते पैसे बुडवून पळून जातात. नीरव मोदी 35 हजार कोटींचे कर्ज घेऊन पळाला. पंतप्रधान त्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीत. नोटाबंदी व जीएसटीमुळे व्यापारी उद्ध्वस्त झाले; पण अमित शहांचे चिरंजीव जय शाह यांना 50 हजारांच्या गुंतवणुकीवर 80 कोटींचा फायदा झाला. पदावर आले तेव्हा आपण देशाचे चौकीदार म्हणून काम करू, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. मात्र, आज ते केवळ श्रीमंतांची चौकीदारी करत असल्याची प्रखर टीका राहुल गांधी यांनी केली.
2019 ला
भाजप सरकार घालवणार
गुजरातच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होत होता, पण वाचले. कर्नाटकात हरले, आता मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये दिसणारही नाहीत. काँग्रेस व विरोधी पक्ष महाराष्ट्रात आणि देशात भाजपचा पराभव करतील, असा विश्‍वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 2019 च्या पराभवाची चाहूल भाजपला लागली आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा यांची भाषणं लक्ष देऊन ऐकली तर आवाजात पडलेला फरक लक्षात येईल. प्रसारमाध्यमांवर, त्यांच्या मालकांवर दबाब आहे, याची आम्हाला कल्पना आहे; पण सहा महिन्यांनी वातावरण बदलेल तेव्हा त्यांचाही आवाज मोकळा होईल. संपूर्ण देश भाजपला पराभूत करण्यासाठी एकवटेल. 50 वर्षे काँग्रेसच्या विरुद्ध लढलो, पण आज भाजपला पराभूत करण्याचे काम केवळ आणि केवळ काँग्रेसच करू शकते, अशी भावना विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने आपल्याजवळ व्यक्त केल्याचे सांगताना निवडणुकीसाठी सज्ज होण्याची हाक राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिली.
अडवणींचा सन्मान आम्ही करतो!
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनादर केला जात असल्याबद्दल राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली. मोदी अडवणींना गुरू मानायचे; पण त्यांचा ते आज आदर करत नाहीत. 2004 व 2009 च्या निवडणुकीत आम्ही वाजपेयी-अडवाणी यांचा पराभव केला; पण संसदेत त्यांचा सन्मान ठेवला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या विरोधात लढलो; पण काल त्यांची प्रकृती बरी नाहीय, असे कळल्यावर रुग्णालयात भेटायला जाणारा पहिला मी होतो, असे सांगत राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांना चिमटे काढले.
सामान्य कार्यकर्ता हाच सेनापती
गुजरातमध्ये नेत्यांच्या शिफारशींनुसार नव्हे तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार निश्‍चित केले होते. तेच धोरण यापुढेही कायम राहील. स्टेजवर बसणारे नेते नव्हे तर सामान्य कार्यकर्ते आमचे सेनापती आहेत, असे सांगत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते देशाच्या उभारणीपर्यंत सर्व बाबतीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे योगदान आहे. काँग्रेस कार्यकर्ते ब्रिटिशांशी लढत होते तेव्हा सावरकर माफीनामे लिहीत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
संघ बदनामी खटल्यात आरोप निश्‍चित
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याच्या खटल्यात भिवंडी न्यायालयात आज राहुल गांधी यांच्याविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केले होते. संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरुद्ध भिवंडी न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली आणि राहुल गांधींवर आरोप निश्‍चित झाले. हे आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. या प्रकरणावर 10 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना संघाच्या विचारधारेविरुद्धचा संघर्ष यापुढेही सुरू राहील, कितीही खटले भरले तरी त्यात बदल होणार नाही, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. राहुल यांच्यासोबत काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: