Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुष्काळी माणची टँकर मुक्तीकडे वाटचाल
ऐक्य समूह
Wednesday, June 13, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: re2
जलसंधारणाच्या कामाची किमया, दोन वर्षात टँकरच्या मागणीत घट
अमोल खाडे
5पळशी, दि. 12 : पिढ्यान् पिढ्या दुष्काळाशी सामना करणार्‍या माण तालुक्यातील जनतेची तहान काही वर्षांपर्यंत टँकरने बारमाही भागवावी लागत होती. मात्र येथे गेल्या तीन वर्षांपासून ‘जलयुक्त शिवार’ व ‘वॉटर कप स्पर्धा’ द्वारे झालेल्या जलसंधारणाच्या मोठ्या कामांमुळे माण तालुक्यात पाणीपातळी वाढली आहे. गेल्या दोन वर्षात येथे टँकरची मागणी अनेक पटीने घटली आहे. त्यामुळे दुष्काळी माणची आता टँकरमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
दुष्काळ हा माणच्या पाचवीला पुजलेला आहे. येथे नेहमीच पर्जन्यमान कमी असते. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. त्या प्रमाणे नेहमीच्या भीषण टंचाईच्या काळात पाण्याची किंमत खर्‍या अर्थाने कळलेल्या नागरिकांनी निरनिराळ्या उपायांनी जलव्यवस्थापन सुरू केले. त्यामुळे आतापर्यंत केवळ चर्चा आणि परिसंवादापुरती मर्यादित राहिलेली जल साक्षरता त्यापुढे जात प्रत्यक्ष आचरणात दिसू लागली आहे. आपत्तीच्या या काळात ‘जल है तो कल है’ ची जाणीव झालेल्या अनेकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यात माण तालुक्यात शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे काही अंशी पाणी टंचाई दूर होऊ लागली होती. त्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे अनेक गावांना प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामध्ये तहसीलदार सुरेखा माने, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तत्कालीन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी रात्रीचा दिवस करून प्रयत्न केले. त्याबरोबर या ‘जलयज्ञा’ मध्ये अनेकांनी सहभागी होऊन हाती खोरे व टिकाव घेऊन जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली.     
त्यामुळे माणमधील अनेक गावात यावर्षी उन्हाळ्यातही विहिरी तुडुंब होत्या. या वर्षी वॉटर कप स्पर्धेत तब्बल 66 गावे सहभागी झाली होती. त्या गावांनी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात माण तालुका नक्कीच जलसमृद्ध होणार आहे. त्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसाने अनेक गावातील नालाबांध, बंधारे व अन्य ठिकाणे पाण्याने तुडूंब भरली असून विहिरी काठोकाट भरून वाहू लागल्या आहे. जलसंधारणाच्या कामाचे हे फलितच म्हणता येईल. माण तालुक्यात या पूर्वी डिसेंबर-जानेवारी महिन्यातच टँकरची मागणी व्हायची. तर काही वेळा येथील जनता टँकर सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरायची. मात्र तीच जनता पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी हाती टिकाव घेऊन या जलक्रांतीत सहभागी झाली.  2017 मध्ये मार्च-21, एप्रिल-43, मे-59,  जून-63 तर यावर्षी मार्च-1, एप्रिल-8, मे-14, जून-6 एवढ्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे. या वर्षी अनेक पटीने टँकरची मागणी घटली आहे. येत्या काळात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने माण तालुका टँकरमुक्त होणार हे मात्र नक्की.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: