Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भय्यूजी महाराजांची गोळी झाडून घेऊन आत्महत्या
ऐक्य समूह
Wednesday, June 13, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn1
नैराश्यामुळे कृत्य; सीबीआय तपासाची काँग्रेसची मागणी
5इंदूर, दि. 12 (वृत्तसंस्था): भक्तांनी ‘युवा राष्ट्रसंत’ अशी उपाधी दिलेले अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराजांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील इंदूर येथील ‘सिल्व्हर स्प्रिंग’ या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मृत्यूसमयी त्यांचे वय 50 वर्षे होते. या घटनेमुळे राजकीय व अध्यात्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. भय्यूजी महाराजांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख असे असून त्यांच्या भक्तांमध्ये अनेक बड्या राजकारण्यांचा समावेश होतो.
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून त्यात आपण नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश सरकारने दबाव आणल्याने भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी काँग्रेसने केली आहे.
भय्यूजी महाराजांनी स्वत:ला एका खोलीत बंद करून घेत उजव्या कानशिलाजवळ पिस्तूल धरून गोळी झाडून घेतली. त्यावेळी घरात त्यांची पत्नी आणि आईही होत्या. गोळी झाडल्याचा आवाज ऐकताच त्यांच्या अनुयायांनी खोलीकडे धाव घेतली; परंतु खोलीचा दरवाजा आतून बंद होता. अनुयायांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी भय्यूजी महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. आयुष्यातील ताणतणाव सहन करण्याच्या पलीकडे गेल्यामुळे आपण आत्महत्या करत असून आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे भय्यूजी महाराजांनी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. कोणी तरी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असेही त्यांनी या चिठ्ठीत म्हटल्याचे इंदूरचे पोलीस महानिरीक्षक मकरंद देऊसकर यांनी सांगितले. पोलिसांनी ही चिठ्ठी आणि भय्यूजी महाराजांकडील परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे. भय्यूजी महाराजांवर कर्जाचा डोंगर होता. दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशीही चर्चा आहे.  
दरम्यान, भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने भय्यूजी महाराजांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा व अन्य सुविधा दिल्या होत्या. त्या बदल्यात त्यांच्यावर पाठिंब्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र, त्यांनी सर्व सरकारी सुविधा नाकारल्या होत्या. या सर्व घडामोडींमुळे भय्यूजी महाराज मानसिक तणावाखाली होते. त्यातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी केली आहे. मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विट करून भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे.
भय्यूजी महाराजांचा अल्प परिचय
भय्यूजी महाराजांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख असे असून त्यांचा जन्म इंदूरजवळील सुजलपूर येथे एका जमीनदार घराण्यात 29 एप्रिल 1968 रोजी झाला होता. अतिशय राजबिंडे असलेल्या भय्यूजी महाराजांनी सुरुवातीला मॉडेलिंग केले होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी सियाराम या कापडाच्या बॅ्रंडसाठी मॉडेलिंग केले होते. चारचाकी वाहन चालवण्यात आणि घोडेस्वारीतही ते तरबेज होते. मात्र, त्यांना अचानक दृष्टांत झाला आणि त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केला. वयाची चाळिशी गाठण्यापूर्वीच त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या, असा दावा त्यांचे भक्त करत. नाथ संप्रदायातील कठोर व्रत आणि दत्तगुरूंना आपले गुरू मानणार्‍या भय्यूजी महाराजांनी दत्त संप्रदायाची शिकवण समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणार्‍या भय्यूजी महाराजांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोकळेपणाने स्वीकार केला होता. फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा ते वापर करत होते. आत्महत्या करण्यापूर्वीही त्यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या भक्तांना मासिक शिवरात्रीच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या ट्विटमध्ये त्यांनी एक संस्कृत श्‍लोकही लिहिला होता. त्यांचे हे अखेरचे ट्विट ठरले.
भय्यूजी महाराजांच्या शिष्यांमध्ये राजकारणी, अभिनेते, उद्योजकांचा समावेश होता. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अभिनेता शेखर सुमन यांच्यासह अनेक जण त्यांचा सल्ला घेत. ‘फेस रीडर’ म्हणून त्यांच्यावर राजकारण्यांचा विश्‍वास होता. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना भय्यूजी महाराजांच्या मध्यस्थीने त्यांनी सद्भावना उपोषण सोडले होते. समाजसेवक अण्णा हजारे यांनी यूपीए सरकारच्या कार्यकाळात लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत केलेले आमरण उपोषणही भय्यूजी महाराजांच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात यश आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने काढलेल्या मूक क्रांती मोर्चांच्या मागेही भय्यूजी महाराज होते, असे बोलले जाते.
सूर्योदय चळवळीतून मोठे कार्य
भय्यूजी महाराजांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेशात सूर्योदय चळवळीतून मोठे सामाजिक कार्य केले. सूर्योदय आश्रमाच्या माध्यमातून शेतीच्या विकासासाठी कृषी तीर्थ प्रकल्प, पर्यावरण संवर्धनासाठी सूर्योदय ग्राम समृद्धी योजना, सूर्योदय स्वयंरोजगार योजना, तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियान, दारिद्र्य निर्मूलन, एडस् जनजागृती अभियान, संस्कार, कला, क्रीडा आदी प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबविले होते. भय्यूजी महाराजांची पहिली पत्नी माधवी यांचे 2015 साली निधन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी त्यांनी शिवपुरी येथील डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी दुसरा विवाह केला होता. भय्यूजी महाराजांना पहिल्या पत्नीपासून त्यांना कुहू नावाची 14 वर्षांची मुलगी आहे. त्यांनी दुसरा विवाह केल्यामुळे त्यांचे मुलीशी पटत नव्हते. त्यातून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्याचबरोबर त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे दीड वर्षापासून त्यांनी राजकीय क्षेत्राशी संबंध कमी केले होते. दरम्यान, भय्यूजी महाराजांच्या अकाली मृत्यूबद्दल अनेक राजकीय नेते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे. अनेकांनी ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांद्वारे आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: