Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सरकारी कर्मचारी, शेतकर्‍यांचा मंत्रालयासमोर ‘आक्रोश’
ऐक्य समूह
Wednesday, June 13, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी मंगळवारी दुपारी मंत्रालयात आक्रोश आंदोलन केले तर देशात व राज्यात मुबलक उत्पादन झाले असतानाही पाकिस्तान, चीन, इजिप्त आदी देशांमधून साखर व शेतमालाची आयात करणार्‍या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकर्‍यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तूर डाळ आणि साखर फेकून आंदोलन केले.
सातवा वेतन आयोग त्वरित लागू करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने द्या, पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा आदी मागण्यांसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आक्रोश आंदोलन केले. मंगळवारी दुपारी मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात वस्तू व सेवा कर, शासकीय मुद्रणालय, शासकीय रुग्णालये, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय, महसूल कार्यालय, दुग्धशाळा आदी कार्यालयांमधील कर्मचार्‍यांनी भाग घेतला. सरकारने कर्मचार्‍यांच्या मागण्या तातडीने मान्य न केल्यास असहकार पुकारण्यात येईल, असा इशारा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने दिला आहे.
शेतकर्‍यांचे साखर फेको आंदोलन
दरम्यान, पाकिस्तान, चीन, इजिप्त आदी देशांमधून आयात केलेली तूर डाळ आणि साखर मंत्रालयाच्या प्रवेश-द्वारावर फेकून शेतकर्‍यांनी मंगळवारी सरकारचा निषेध केला. 
देशात तूर व साखरेचे भरघोस उत्पादन झाले असतानाही केंद्र सरकारने पाकिस्तान, चीन, इजिप्तमधून साखर आणि तूर डाळ आयात केल्याने शेतकरी संतप्त आहे. शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी पुन्हा आंदोलन केले. संतप्त शेतकर्‍यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर साखर आणि तूर डाळ फेकत सरकारचा निषेध केला. यावेळी घोषणाबाजीही झाली. या आंदोलनात शेतकरी सुकाणू समिती, जनता दल सेक्युलर व इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: