Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जावलीतील शेतकर्‍यांची बावीस लाखांची फसवणूक
ऐक्य समूह
Wednesday, June 13, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: re2
पीक कर्ज महाघोटाळ्याने खळबळ
5कुडाळ, दि. 12 : मंगेश भरत निकम याने बँक ऑफ महाराष्ट्रचे कुडाळचे शाखाधिकारी मनोज लोखंडे व बँकेतील शिपाई गाढवे यांनी संगनमताने व विश्‍वासघाताने पीक कर्जाकरिता कागदपत्र तयार करून 2,96,000/- रुपये कर्ज काढून त्यातील काही एक पैसे मला न देता आमची फसवणूक केली असल्याची तक्रार करंदी, ता. जावली येथील शेतकरी नवनाथ तानाजी निकम याने मेढा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर नंतर संबंधितांनी आणखी सात जणांची फसवणूक केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा बावीस लाखांवर पोहोचला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मंगेश निकम व शिपाई गाढवे यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पैकी बँकेचा शिपाई गाढवे याला जामीन मिळाला आहे. बँकेचे तत्कालीन कुडाळ शाखा व्यवस्थापक मनोज लोखंडे यांचा पोलीस शोध घेत आहेत.
मंगेश निकम याने जावलीतील गरीब शेतकर्‍यांना भुलवून त्यांच्या कर्ज प्रकरणाची कागदपत्रे व आधारकार्ड नंबर घेतले. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या तत्कालीन   व्यवस्थापक मनोज लोखंडे यांच्या सांगण्यावरून शिपाई गाढवे यांनी कर्जदारांच्या घरी जाऊन त्यांच्या सह्या घेतल्या असल्याचे नवनाथ निकम यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी आणि कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी मेढा पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन सपोनि. जीवन माने यांनी केले आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि. जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूर्यकांत शिंदे करत असून यात नेमकं सत्य काय याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: