Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग शिखर बैठक ऐतिहासिक दस्तऐवजावर स्वाक्षर्‍या
ऐक्य समूह
Wednesday, June 13, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: mn2
5सिंगापूर, दि. 12 (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सुरू असलेला वाद आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांनी एकमेकांवर व्यक्तिगत पातळीवर जाऊन केलेली टीका आणि एकमेकांच्या देशांवर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या दिलेल्या धमक्या या पार्श्‍वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये मंगळवारी सिंगापूरच्या सांतोसा बेटावरील हॉटेल कॅपेला येथे ऐतिहासिक शिखर बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी ऐतिहासिक दस्तऐवजावर स्वाक्षर्‍या करताना कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्याची प्रतिज्ञाकेली. त्यामुळे जागतिक शांततेचा नवा आशेचा किरण दिसू लागला आहे.
या दोन देशांच्या अनेक दशकांच्या कडवट संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही राष्ट्रप्रमुखांची भेट घडवून आणण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले प्रयत्न, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन यांच्यातील यापूर्वी रद्द झालेली बैठक आणि गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या ऐतिहासिक शिखर बैठकीची सुरू   झालेली चर्चा, या पार्श्‍वभूमीवर अवघ्या जगाचे लक्ष ट्रम्प-किम यांच्या भेटीकडे लागले होते. अखेर आज सकाळी साडेनऊ वाजता, म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.30 वाजता या दोन्ही राष्ट्रप्रमुखांची सिंगापूरच्या सांतोसा या शांत बेटावरील हॉटेल कॅपेलामध्ये हे शिखर बैठक झाली. ट्रम्प आणि किम यांच्यात 13 सेकंद हस्तांदोलन झाल्यावर दोन्ही देशांमधील चर्चेला सुरुवात झाली. ट्रम्प आणि किम या दोन नेत्यांमधील चर्चेबरोबर दोन्ही देशांच्या अधिकारी व मंत्र्यांमध्येही चर्चा झाली. दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम यांनी अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळली तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई यांनी उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळली.
या ऐतिहासिक भेटीनंतर ट्रम्प यांनी किम यांचे कौतुक केले. किम यांच्यासोबतची चर्चा चांगली झाली. कोणतीही मोठी समस्या आम्ही दोघे चुटकीसरशी सोडवू शकतो. दोघेही एकत्र आल्यास यश हमखास मिळेल. तो दिवस लवकरच येईल, असा आत्मविश्‍वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला. आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहतील. किम यांच्या भेटीमुळं खूपच आनंदित आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
आम्ही आता भूतकाळ मागे टाकून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जग एक मोठा बदलाचे साक्षीदार असेल. सिंगापूरमध्ये होणार्‍या या बैठकीच्या वाटेत अनेक अडथळे होते. ते अडथळे पार करून आम्ही इथे पोहोचलो आहे, असे किम म्हणाले. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी ऐतिहासिक संयुक्त सर्वसमावेशक दस्तऐवजावर स्वाक्षर्‍या केल्या. मात्र त्यांनी बैठकीतील चर्चेची सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. दोन्ही देशांच्या जनतेच्या इच्छेनुसार शांतता आणि परस्पर समृद्धीसाठी दोन्ही देशांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यात येतील. कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करून तेथे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला जाईल. कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करताना उत्तर कोरियाला अमेरिका संपूर्ण सुरक्षेची हमी देईल, असे या दस्तऐवजामध्ये म्हटले आहे. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी स्वतंत्रपणे संवाद साधताना उत्तर कोरियाच्या निशस्त्रीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती दिली. त्याचबरोबर दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील लष्करांचा संयुक्त सरावदेखील थांबवण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. उत्तर कोरिया आपल्याकडील सर्व अण्वस्त्रे नष्ट करत नाही आणि आम्हाला याची खात्री होत नाही तोपर्यंत उत्तर कोरियावरील निर्बंध कायम राहतील, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. त्यासाठी उत्तर कोरियाला कालमर्यादा दिली आहे का, असे विचारले असता उत्तर कोरियाला या प्रक्रियेसाठी बराच कालावधी लागेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान, किम जोंग यांच्याबरोबरच्या शिखर बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाई-इन यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे जागतिक शांततेच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: