Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरमध्ये जवानाचे अपहरण
ऐक्य समूह
Friday, June 15, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: na1
सीमेवर दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5श्रीनगर, दि. 14 (वृत्तसंस्था) : रमजान ईदसाठी सुट्टीवर असलेल्या औरंगजेब या लष्करी जवानाचे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी अपहरण केले असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, बांदीपोरा जिल्ह्यातील पनार जंगलात गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांशी लढताना एका जवानाला वीरमरण आले.
पूँछ येथे राहणार्‍या औरंगजेब या लष्करी जवानाचे दहशतवाद्यांनी गुरुवारी पुलवामामधून अपहरण केले. तो 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात तैनात होता. कुख्यात दहशतवादी समीर टायगरला सुरक्षा दलांनी चकमकीत ठार मारले होते. त्या चकमकीत औरंगजेब सहभागी होता. औरंगजेब याचा शोध घेण्यात येत आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. तो पूँछ येथे राहणारा असून त्याने रमजान ईदसाठी सुट्टी घेतली होती. तो गाडीने घरी परतत असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. मागच्या वर्षी मे महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये उमर फय्याझ या निशस्त्र लष्करी अधिकार्‍याचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती. पवित्र रमजानच्या महिन्यात काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्र सरकारने एकतर्फी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. मात्र, याच काळात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत, असे लष्करी अधिकार्‍याने सांगितले.
दोन दहशतवादी ठार
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील पनार येथील जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांशी लढताना एका जवानाला वीरमरण आले. बांदीपोरा येथे गेल्या सहा दिवसांत भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक चकमकी झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी पुन्हा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. त्यात जवानांनी दोन दहशतवाद्यांना टिपले तर एक जवान शहीद झाला आहे. पनारच्या जंगलात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती असून लष्कराचे जवान जंगलात  शोधमोहीम राबवत आहेत.
दहशतवादी हल्ल्यात पत्रकार ठार
दरम्यान, श्रीनगर येथे सायंकाळच्या सुमारास दहशतवाद्यांच्या हल्ल्यात स्थानिक पत्रकार शुजात बुखारी आणि त्यांचा सुरक्षारक्षक असे दोघे ठार झाले. बुखारी हे ‘रायझिंग काश्मीर’ या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक होते. या हल्ल्याबाबत अधिक माहिती समजू शकली नाही. बुखारी हे धाडसी पत्रकार म्हणून ओळखले जात. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: