Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मलालाचा हल्लेखोर दहशतवादी फजलुल्ला ठार
ऐक्य समूह
Saturday, June 16, 2018 AT 11:46 AM (IST)
Tags: na2
5इस्लामाबाद, दि. 15 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातील पेशावर येथील लष्करी शाळेवर हल्ला करणारा, मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही असलेल्या मलाला युसुफजाई या नोबेल विजेत्या मुलीवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजलुल्ला हा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील कुनार प्रांतात अमेरिकेने ही कारवाई केली. कुनार प्रांतात 13 जूनपासून अमेरिकन सैन्यांची मोहीम सुरू होती. त्यात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मुल्ला फजलुल्ला ठार झाला. ‘तहरीक-ए-तालिबान’ ही संघटना ‘अल-कायदा’शी संलग्न आहे. या संघटनेने फैजद शहजाद या अतिरेक्याला टाइम्स स्न्वेअर हल्ल्यासाठी प्रशिक्षण दिले होते. फजलुल्लाने काही दहशतवाद्यांसह डिसेंबर 2014 मध्ये पेशावर येथील लष्करी शाळेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 151 जण ठार झाले होते. त्यात 130 लहान मुलांचा समावेश होता. त्याशिवाय दहशतवाद्यांविरोधात उघड भाष्य करणार्‍या आणि मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही असणार्‍या मलालावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात मलाला गंभीर जखमी झाली होती. ‘तहरीक-ए-तालिबान’च्या म्होरक्या म्हणून फजलुल्लाने 2013 मध्ये सूत्रे स्वीकारली होती. अमेरिकेने फजलुल्लाची माहिती देणार्‍याला 50 लाख डॉलर म्हणजेच 34 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: