Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

ध्येयवादी योगप्रसारक
vasudeo kulkarni
Friday, July 06, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: vi1
गेले अर्धशतक देशात आणि परदेशात योगविद्येचा प्रसार-प्रचार करणार्‍या योगाचार्य विश्‍वास मंडलिक यांच्या योगदानाबद्दल केंद्र सरकारने पंतप्रधान पुरस्कारासाठी केलेली निवड हा त्यांच्या योगप्रसाराच्या कार्याचा सन्मान होय! नाशिक येथे मध्यमवर्गीय कुटुंबात 1944 मध्ये जन्मलेल्या मंडलिक यांनी पुण्याच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी 1967 मध्ये मिळवली. व्होल्टास ट्रान्स्फॉर्मर्स या बहुराष्ट्रीय कंपनीत पुणे येथे बारा वर्षे नोकरी केल्यावर त्यांनी नाशिक येथे इलेक्ट्रिक ट्रान्स्फॉर्मरच्या निर्मितीचा स्वत:चा कारखाना सुरू केला. याच काळात त्यांची योगसाधनाही सुरू होती. उत्तम चालणारा उद्योग बंद करून त्यांनी 1978 मध्ये नाशिक येथे योगविद्याधाम या संस्थेची स्थापना करून आपले सारे जीवन योगविद्येच्या प्रसार आणि शिक्षणासाठी समर्पित केले आहे. योगविद्याधाम या संस्थेतर्फे योगशिक्षकांना योगविद्येचे प्रशिक्षण दिले. नाशिकच्या पन्नास शाळात प्रारंभीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना योगविद्या शिक्षणाचे कार्य केले. त्यानंतर याच संस्थेमार्फत योग प्रशिक्षणाचे अभ्यासक्रमही सुरू केले. महाराष्ट्रातल्या पन्नास शहरात योगविद्याधाम संस्थेची योग आणि योग प्रशिक्षणाची केंद्रे सुरू आहेत. परदेशातही योगविद्याधामच्या शाखा आहेत. या संस्थेद्वारे देशाच्या सर्व भागात त्यांनी केंद्रे सुरू केली आणि देशी-परदेशी लोकांना निरामय आरोग्याचा मूलमंत्र योगविद्येद्वारे दिला. योगासने म्हणजे फक्त व्यायाम नाही तर निरामय आरोग्याची ती गुरुकिल्ली असल्याचे मंडलिक यांनी पटवून दिले.
नाशिकचे त्यांचे योगविद्याधाम हे विद्यापीठ देश-विदेशात, योगशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. याच संस्थेमार्फत त्यांनी देशभरात योगशिक्षणाच्या हजारो कार्यशाळा घेतल्या. स्वयंसेवक घडवले. देशातल्या 150 योगविद्याधामच्या केंद्रात दररोज हजारो योगसाधक योगसाधना करतात.
योगविद्येवर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. योगसाधनेद्वारे विविध विकारांवर मात करता येते, हेही त्यांनी 35 हजारांच्यावर रुग्णांवर यशस्वी योगोपचार करून सिद्ध करून दाखवले आहे. पाठदुखी, अस्थमा, मधुमेह, सांधेदुखी अशा विकारांनी ग्रासलेल्या हजारो रुग्णांवर त्यांनी योगोपचार केले आहेत. जगातल्या पहिल्या योगविद्यापीठाचे योगगुरू परमहंस निरजानंद सरस्वती यांनी 2007 मध्ये मंडलिक यांना ऋषी संन्यास देऊन ऋषी धर्मज्योती असे नवे नावही दिले. योगापॉइंट डॉट कॉम या संकेतस्थळाद्वारे परदेशी योगसाधकांना संस्थेद्वारे मार्गदर्शन केले जाते. त्र्यंबकेश्‍वर येथे मंडलिक यांनी योगविद्या गुरुकुलची स्थापनाही केली आहे. त्यांच्या योगप्रसाराच्या कार्याचा सरस्वती पुरस्कार, नाशिक भूषण, दधिची यासह अनेक पुरस्कारांनी गौरव झाला आहे. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: