Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान
ऐक्य समूह
Friday, July 06, 2018 AT 10:52 AM (IST)
Tags: mn3
वैष्णवांच्या भक्तिकल्लोळात पावसाचीही हजेरी
5पुणे, दि. 5 (प्रतिनिधी) : पंढरीत बसलेल्या विठू सावळ्याच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या भक्तिकल्लोळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने गुरुवारी दुपारी देहूनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ‘तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा अखंड घोष अन् टाळ-मृदुंगांचा गजर करत वैष्णवांनी प्रस्थान सोहळ्यात हरिभक्तीचे रंग भरले. पालखी प्रस्थानाच्या वेळी पावसानेही हजेरी लावल्याने वारकरी आणखीनच सुखावले. दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे उद्या, दि. 6 रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी गुरुवारी पहाटेपासूनच देहूनगरीत उत्साही वातावरण होते. पहाटे मुख्य मंदिर व शिळा मंदिरात पालखी सोहळाप्रमुख सुनील मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. धार्मिक विधी संपल्यानंतर सकाळी दर्शनबारी सुरू करण्यात आली. दर्शनाला जाण्यापूर्वी स्नान करण्यासाठी भल्या पहाटे इंद्रायणीचा काठ वैष्णवांनी फुलून गेला होता. सकाळी दहाच्या सुमारास सप्ताह काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुका आणून महापूजा करण्यात आली. महापूजा सुरू असताना मंदिर परिसरात विठोबा-तुकारामाच्या जयघोषाचा आवाज टिपेला पोहोचला. भजन-कीर्तनाचा अखंड नाद, सार्‍यांनीच भान हरपून धरलेला फुगड्यांचा फेर, टाळ-मृदुंगांचा लयबद्ध आवाज, त्यातच रिमझिम पाऊस, अशा भरलेल्या वातावरणात मानकर्‍याने परंपरेप्रमाणे पादुका डोक्यावर घेऊन वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात त्या आणल्या.
त्यानंतर प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. पालखी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आली आणि महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली. या सोहळ्यास पालकमंत्री गिरीश बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. अमर साबळे, आ. बाळा भेगडे, माजी आमदार बबनराव पाचपुते उपस्थित होते. पादुकांची पूजा सुरू असताना दुसरीकडे मंदिराच्या आवारात टाळ-मृदुंगांचा गजर सुरू झाला. त्याबरोबरीने वारकर्‍यांचे विविध खेळही रंगले. वारकर्‍यांनी फुगडीचा आनंद लुटला. पालखी प्रस्थानाची तुतारी वाजली अन् ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, असा घोष करत देहूकरांनी पालखी खांद्यावर घेतली. त्यामुळे वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण आले. देऊळवाड्याची प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाड्यात आजोळघरी पोहोचली. तुकोबारायांची पालखी उद्या, दि. 6 रोजी सकाळी पिंपरी-चिंचवडच्या दिशेने प्रस्थान ठेवेल आणि सायंकाळी पाच ते साडेपाचच्या  सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पालखीचे आगमन होईल. तेथे महापालिकेच्यावतीने पालखीचे आणि दिंडीप्रमुखांचे स्वागत झाल्यानंतर पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ होईल. तेथे मुक्काम झाल्यानंतर शनिवारी (दि. 7) पालखी पुण्यात दाखल होईल. दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे उद्या, दि. 6 रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी अलंकापुरीत दाखल झाले आहेत. सोहळ्यातील श्रींच्या अश्‍वाचे शाही लवाजम्यासह आगमन झाले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: