Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

सत्ता राखण्याचे मोठे आव्हान
ऐक्य समूह
Friday, July 06, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: st1
देशात भाजपचा विजयरथ काही प्रमाणात रोखण्यात एकत्र आलेल्या विरोधकांना यश आले आहे. या पार्श्‍वभूमीवर राजस्थानमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांकडे पहायला हवे. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसकडे आलटून पालटून सत्ता जात असते. सध्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्या विरोधात इथले वातावरण तापत आहे. या पार्श्‍वभूमीवर घेतलेला या राज्यातील ताज्या राजकीय परिस्थितीचा वेध
राजस्थान विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपनं काँग्रेसच्या हातून सत्ता काढून घेतली होती. अशोक गेहलोत यांचे मुख्यमंत्रिपद गेले. काँग्रेसचे पानिपत झाले. भाजपने वसुंधराराजे शिंदे यांच्याकडे नेतृत्व दिले परंतु वसुंधराराजे यांचा गेल्या चार वर्षांमधील कारभार फारसा समाधानकारक नाही. उलट, तो वादग्रस्त ठरत आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाही याची जाणीव आहे. दिल्लीपासून अवघ्या दोनशे किलोमीटरवर असलेल्या राजस्थानची सत्ता राखायची असेल तर आता वसुंधराराजे यांच्या नावावर मते मागून चालणार नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या राज्यातील निवडणूक प्रचाराची सूत्रे स्वतःकडे घेतली आहेत.
आयपीएल सामन्यातील घोटाळ्यात हात असलेल्या ललितकुमार मोदी यांच्याशी वसुंधराराजे यांचे चिरंजीव दुष्यंतकुमार यांची भागीदारी आहे. ललितकुमार यांच्या पत्नीला वसुंधराराजे यांनी सरकारी पद दिले होते. आयपीएल सामने पाहण्यासाठी वसुंधराराजे यांनी केलेल्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च हा वादाचा विषय झाला होता. ललितकुमार मोदी यांच्या पलायनाचा मोदी सरकारलाही फटका बसला. एकीकडे ही स्थिती असताना वसुंधराराजे यांच्याविरोधात राजस्थानमध्ये वातावरण तयार झाले. त्यांच्या व त्यांचा मुलगा दुष्यंतकुमार यांच्या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली. गेल्या चार वर्षांमध्ये राजस्थानमध्ये गोरक्षकांनी  धूडगूस घातला. त्यात काही बळीही गेले. बिकानेर परिसरात दंगली झाल्या. दलितांवर हल्ले झाले. त्यामुळे दलित समाज भाजपवर नाराज झाला. अर्थात तो काँग्रेसवरही फार खूश आहे, अशातला भाग नाही; परंतु भाजपवरची नाराजी दलितांनी लोकसभेच्या तीन पोटनिवडणुकांमधून व्यक्त केली. राजस्थानमध्ये गेल्या चार वर्षांमध्ये आरक्षणाचा मुद्दा वारंवार गाजला. त्याबाबत सरकारला काहीच करता आले नाही. राजस्थानमध्ये मुस्लीम समाजही भाजपवर नाराज आहे. या समाजाची लोकसंख्याही निर्णायक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे तसेच तीन पोटनिवडणुकांचे निकाल पाहिले तर भाजपपुढचे आव्हान किती तगडे आहे, हे लक्षात येते.
भाजप बंडखोरांचा नवा पक्ष
मागील निवडणुकीप्रसंगी काँग्रेसच्या काळातील गैरव्यवहार आणि राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांच्या राजस्थानमधील जमीन खरेदी घोटाळ्याचं भांडवल करण्यात आले होते. त्याचा फायदा  भाजपने उठवला;  परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये त्यातून काहीही सिद्ध करण्यात भाजपला यश आले नाही. उलट आता तर भाजपच्या आमदारांनीच प्रादेशिक पक्ष स्थापन केला असून या पक्षाने दोनशे जागांवर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या कामगिरीवर जनता नाराज नाही; परंतु राज्य सरकारच्या कामगिरीवर खूश नाही, ही वस्तुस्थिती आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांनी वसुंधराराजे यांचे नेतृत्व बदलण्याची मागणी करून नेतृत्वात बदल केला नाही, तर सत्ता हातून जाईल, असा इशारा दिला आहे. वसुंधराराजे यांना पर्याय सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजमेरसह अन्य निवडणुकांमध्ये भाजपपासून दूर गेलेल्या दलित मतदाराला पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेतृत्वाने सुरू केला होता.
दरम्यान, काँग्रेसने कुमारी शैलजा यांची छाननी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून अनुसूचित जाती-जमातीत एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही घटक भाजपच्या विरोधात आंदोलने करत असताना या वर्गाच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत आरक्षित 34 जागांपैकी एकही जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला नव्हता. भाजपला 32 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसची ही हक्काची मतपेढी भाजपने फोडली होती. दोन जागा इतर पक्षांना मिळाल्या होत्या. बिकानेरमध्ये मागासवर्गीय विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार, आमदारांना पोलीस अधिकार्‍यांनी दिलेली वागणूक आणि मीना समाजाने अजमेर मतदारसंघात केलेले मागासवर्गीयांचे नृशंस हत्याकांड यामुळे हा समाज भाजपवर चिडला आहे. सत्ताधारी गटाच्या मागासवर्गीय आमदाराचा अवमान होऊनही पक्षाने पोलीस अधिकार्‍याची बाजू घेतली. अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांवरील अन्यायाच्या वेळी सरकारमधील मंत्र्यांनी धावून जावे असे त्यांना वाटले नाही. पोलिसांनी अनुसूचित जातीच्या लोकांविरोधात केलेल्या कारवाईमुुळे भाजपचे नेते स्वपक्षीय सरकारला दूषणे देत आहेत.
भाजपची मोर्चेबांधणी
राजस्थानमधील या परिस्थितीची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना जाणीव आहे. त्यामुळे तर शाह यांनी राजस्थानवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांनीही राजस्थानमध्ये दौरे वाढवले आहेत. त्यांनी राजस्थानची सूत्रे सचिन पायलट यांच्याकडे दिली आहेत. भाजपने ‘संपर्क से समर्थन’ योजनेअंतर्गत दिग्गजांच्या भेटीगाठी घेऊन निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच वेळी समविचारी पक्षाची युती करण्यावर काँग्रेसनं भर दिला आहे. बहुजन समाज पक्ष राजस्थानच्या निवडणुकीत उतरत असतो. या पक्षामुळे मतविभागणी होणार नाही याची दक्षता आता काँग्रेस पक्ष घेत आहे. सध्या मायावती यांच्या कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पक्ष कोणाशीही युती करणार नाही, असे म्हटले असले तरी हा दबावाचा भाग आहे. काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष युती करण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेत पवार यांनी राहुल यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आक्रमक प्रचार करण्याचा कानमंत्र दिला. पवार आणि राहुल यांचे अलीकडच्या काळात किती सूत जुळले आहे, हे यावरून लक्षात यायला हरकत नाही. पवार दिल्लीत आल्याचे कळल्यावर राहुल यांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपविरोधात आगामी डावपेच आखण्यावर या भेटीत जोर देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पक्षांतर्गत गटबाजी
गेल्या काही दिवसांमध्ये आर्थिक, राजकीय आणि सामाजिक आघाड्यांवर घडलेल्या मोठ्या घटनांनी देश ढवळून निघाल्यानंतर लोकनीती, सीएसडीएस आणि एबीपी न्यूज यांनी संयुक्तपणे केलेल्या ‘देश का मूड’ या निवडणूक सर्वेक्षणात उत्तरेकडील राज्यांचा कल भारतीय जनता पक्षापासून ढळल्याचे समोर आले आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात 45 टक्के मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला होता. आता हा आकडा 39 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. कर्नाटकमधील निवडणूक निकाल आणि त्या नंतरच्या घडामोडी भाजपसाठी धक्कादायक ठरल्या असताना सर्वेक्षणांचे या धक्क्याची तीव्रता वाढवणारे निष्कर्ष समोर आले आहेत.
राजस्थानमध्ये काँग्रेसने आपली टक्केवारी वाढवली आहे. सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो, की राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होऊ शकतो. ही परिस्थिती पाहिली आणि भाजपतली अंतर्गत बंडाळी शमली नाही तर भाजपच्या विजयाचा वारू मरुभूमीत रोखला जाऊन पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वसुंधराराजे यांनी आता भाजपच्या आमदारांना कितीही चुचकारण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकायला तयार नाहीत. शाह यांनाच त्यांची समजूत काढावी लागेल. गेल्या पाच वर्षांमध्ये विकासा पेक्षा अंतर्गत गटबाजीने भाजपच्या कामाची चर्चा झाल्याने पाच वर्षांमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला सातत्याने अपयश येत गेले. या परिस्थितीत आता शाह आणि मोदी यांच्यासमोर भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचे आव्हान आहे. राजस्थानची लढाई भाजपसाठी सोपी राहिलेली नाही. या राज्यात काँग्रेस प्रयत्नपूर्वक स्वत:ची ताकद वाढवत आहे.  राजस्थानचे रण यंदा चांगलेच तापणार आहे.
                 - शिवशरण यादव
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: