Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

शाळा की छळछावणी?
vasudeo kulkarni
Friday, July 06, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: lolak1
 गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले. इंग्रजी माध्यमातल्या शाळात शिकणार्‍या मुलांची बुद्धिमत्ता अधिक वाढते, या शाळात मुलांना शिस्त लागते, असा पालकांचा समज असल्याने, दरमहा हजारो रुपयांची फी आकारणार्‍या खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांना चांगले दिवस आलेत. मुलांचा झकपक गणवेश, मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी रस्त्यावर धावणार्‍या पिवळ्या रंगाच्या ‘स्कूल बस’, मुलांनी इंग्रजी बोलणे हे सारे पालकांना प्रतिष्ठेचे लक्षण वाटायला लागले. याच संधीचा लाभ घेत खाजगी संस्था चालकांनी वेगवेगळ्या कारणासाठी भरमसाट फी उकळायचा गोरख धंदा सुरू केला आणि पालकही आपले मूल स्मार्ट होणार, अशा समजात संस्था चालकांनी वाढवलेली फी निमूटपणे भरायला लागले. खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा चालकांवर सरकारी शिक्षण खात्याचा कोणताही अंकुश नसल्याचा सोयीस्कर समज करून घेत, खाजगी शिक्षण संस्थांच्या काही शाळा चालकांनी विद्यार्थ्यांसाठी कडक नियमांची अंमलबजावणी धडाक्याने सुरू केली. पण फक्त पैसा मिळवणे आणि तथाकथित शिस्त म्हणजे दर्जेदार शिक्षण नाही, याचा सोयीस्कर विसर पडलेल्या पुण्यातल्या मायर्स एमआयटी विश्‍वशांती गुरुकुल शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांवर लादलेले अत्यंत कडक आणि जाचक नियम पाहता, ही शाळा आहे की विद्यार्थ्यांची छळछावणी-तुरुंग असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे.
पुण्यातली विश्‍वशांती गुरुकुल ही नावाजलेली आणि दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली शाळा. सर्वसामान्य आणि गोरगरीब पालकांना या शाळेत आपल्या मुला-मुलींना पाठवणे शाळेच्या प्रचंड फीमुळे शक्य होत नाही. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांचीच मुले या शाळेत शिकतात. शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब कुटुंबातल्या काही मुलांना या शाळेत प्रवेश मिळालाही असेल. पण ही शाळा श्रीमंत वर्गातल्या मुलांसाठीच आहे.
शाळेने या वर्षी विद्यार्थ्यांना दिलेल्या डायरीत पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नमूद केलेली अत्यंत कडक आणि जाचक नियमावली वाचून, संतप्त झालेल्या 59 पालकांनी थेट या शाळेच्या प्रशासनाविरुद्ध शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. उपग्रह वृत्तवाहिन्यांवरूनही या जाचक नियमांचा जाहीर पंचनामाही झाला. शाळेच्या या नव्या नियमात मुलींनी पांढर्‍या किंवा स्कीन रंगाचीच अंतर्वस्त्रे वापरावीत, स्कर्टची लांबी शाळेच्या नियमानुसार असावी, विद्यार्थ्यांनी केस बारीक ठेवावेत, पालकांनी परस्परांशी बोलू नये, पालकांनी शाळेच्या कारभाराविरोधी आंदोलन करू नये, तसे केल्यास, पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, मुलींनी लिपस्टिक, लिप ग्लॉस किंवा कोणतीही सौंदर्य प्रसाधने वापरू नयेत, शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी, पालक, पालकांनी शाळेच्या कॅम्पसबाहेरच्या कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ नये, शाळेत सायकल घेऊन आल्यास, त्यासाठी दरमहा 1500 रुपयांचे पार्किंग शुल्क द्यावे लागेल, ग्रंथालयासाठी मासिक 500 रुपये शुल्क द्यावे लागेल, अशा कडक नियमांचा समावेश आहे. राज्य घटनेने दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्यावर आपण गदा आणत आहोत, याचे भान या शाळेच्या प्रशासनाला नाही. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि मुलींची छेडछाड होऊ नये, या उद्देशानेच ही कडक नियमावली लागू केल्याचे शाळेच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. या तुघलकी फतव्याने संतप्त झालेल्या पालकांनी ही शाळा आहे की तुरुंग असा केलेला रोकडा सवालच प्रशासनाच्या हुकूमशाही कारभाराचा पंचनामा करणारा ठरला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: