Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पावसाचा धुमाकूळ, नागपूर तुंबले
ऐक्य समूह
Saturday, July 07, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: mn1
विधानभवनाची वीजही गेली; कामकाज तहकूब
5नागपूर, दि. 6 (प्रतिनिधी) : गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या तुफान पावसामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात शुक्रवारी पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे नागपूरचे रस्ते, रेल्वेस्थानक, नाले, विमानतळ जलमय झालेच, शिवाय विधानभवन परिसरातही गुडघ्यापर्यंत पाणी साठल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे आजचे कामकाज तहकूब करावे लागले. हे पाणी विधिमंडळाच्या तळघरात घुसले. तळघरात विजेचे ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आले असून ते पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे संपूर्ण विधानभवनात काळोख पसरला होता.
मागच्या आठवड्यात मुंबईची तुंबई करणार्‍या वरुणराजाचे काल विदर्भात जोरदार आगमन झाले. बुधवारी रात्रीपासून पावसाची आवर्तने सुरू होती. मात्र, गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढत गेला. शुक्रवारी सकाळी पावसाने रौद्र रूप धारण करत नागपूर शहरात प्रलयाची स्थिती निर्माण केली. सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या सहा तासांत नागपूर शहरात तब्बल 263.5 मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. 21 जुलै 1994 रोजी 24 तासांत नागपूरमध्ये 304.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. 24 वर्षांचा हा विक्रम आज मोडीत निघाला. यामुळे रस्ते, रेल्वे व हवाई वाहतूक ठप्प झाली होती. विधानभवन, मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या रविभवन परिसरातही प्रचंड पाणी साचले. अनेक मंत्र्यांच्या व विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यातच पाणी शिरले. पावसामुळे विधिमंडळातील टेलिफोन व इंटरनेट सेवाही बंद पडली. विमानळावर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वादळी पावसाने नागपूर विमानतळावर विमाने उतरत नव्हती. मुंबई व पुण्याहून नागपूरला येणारी सकाळची विमाने हैद्राबादकडे वळवण्यात आली. नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनलाही या पावसाचा तडाखा बसला. विधानभवन परिसरात पाणी तुंबल्याने व वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. त्यामुळे सरकारचे वाभाडे काढण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाली. मुंबई तुंबते तेव्हा शिवसेनेकडे बोट दाखवणार्‍या भाजपला आज नागपूरची दैना उडाल्याने टीकेला सामोरे जावे लागले. पुरेशी पूर्वतयारी न करता नागपूरमध्ये पाव साळी अधिवेशन घेण्याचा दुराग्रह सरकारच्या चांगलाच अंगलट आला.
विधिमंडळाचे कामकाज ठप्प
विधानभवन परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साठले होते. हे पाणी विधिमंडळाच्या तळघरात घुसले. तळघरात विजेचे ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आले असून ते पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला. आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने दहा वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार होते; परंतु वीजपुरवठा खंडित केल्याने संपूर्ण विधानभवनात काळोख पसरला होता. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात येऊन वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत म्हणजे एक तासाभरासाठी कामकाज थांबवावे लागत असून नियमित बैठक 11 वाजता सुरू होईल, अशी घोषणा केली.
नंतरच्या तासाभरातही वीजपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नव्हती. पावसाचाही जोर वाढत होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. आजचे कामकाज स्थगित ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेची बैठक 11 वाजता सुरू झाली तेव्हा सर्वत्र अंधाराचेच वाचावरण होते. अध्यक्ष बागडे हे मोबाईलच्या प्रकाशात त्यांच्या दालनातून विधानसभेच्या अध्यक्षीय व्यासपीठावर आले. माईक व्यवस्था व सभागृहातील दिवेही बंद होते. त्यांनी दिवसभराचे कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. 
1961 साली नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन झाले होते, तेव्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने विधिमंडळाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. त्यानंतर प्रथमच असा प्रसंग आला. दुपारी 12 वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले, तोवर वीजपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला होता; परंतु पावसाची स्थिती लक्षात घेऊन सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिवसभराचे कामकाज तहकूब केले.
गटारात सापडल्या दारूच्या बाटल्या
पावसामुळे विधानभवन परिसरात दीड फुटापर्यंत पाणी साठले होते. अशी पूरस्थिती निर्माण होईल, अशी अपेक्षा नसल्याने विधानभवनातील नालेसफाईचे काम केले गेले नव्हते. तुंबलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटारांची झाकणे उघडून सफाईचे काम सुरू करण्यात आले. नाल्यातील कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू झाले तेव्हा त्यासोबत दारूच्या रिकाम्या बाटल्याही बाहेर यायला लागल्या. एवढ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बाटल्या आतपर्यंत पोहोचल्याच कशा, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. विधिमंडळ हे लोकशाहीतील पवित्र मंदिर आहे. दारूच्या बाटल्या इथपर्यंत कशा आल्या, याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली तर काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी, ‘मी लाभार्थी...’ अशी जाहिरात करणार्‍या सरकारने या दारूच्या बाटल्यांचा ‘लाभार्थी’ कोण होता, याचीही चौकशी करावी, असा टोला लगावला.
विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र
पाऊस व वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विधिमंडळाचे कामकाज तहकूब करावे लागल्याने विरोधकांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. कोणतीही तयारी नसताना सरकारने हट्टाने नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. या सरकारकडे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ नाही, म्हणूनच पाऊस आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की ओढवली. भाजप-शिवसेना सरकारने महाराष्ट्राला अगोदरच अंधारात ढकलले आहे. आज विधिमंडळालाही अंधारात ढकलले. राज्य तर अगोदरच बुडवले आहे, आता विधानभवनही बुडते की काय, अशी गंभीर परिस्थिती या सरकारने निर्माण करून ठेवल्याची टीका विखे-पाटील यांनी केली. विधानभवनातील गटारात दारूच्या बाटल्या सापडल्या. हे सरकार मागील चार वर्षांपासून शुद्धीवर का नाही, याचे कारण आता उमगले, असा टोलाही त्यांनी लगावला.
साडेतीन वर्षांत सरकारचं नियोजन जसं पूर्णपणे फसलं आहे, तसंच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन हे सरकार फसलं आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. अलीकडच्या काळात पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालेले नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊ नका, अशी विनंती आम्ही केली होती. मोठा पाऊस पडल्यास नागपूरमध्ये राहण्याच्या व्यवस्थेपासून विधिमंडळाच्या कामकाजापर्यंत परिणाम होईल, याची कल्पनाही दिली होती. भाजपच्या ताब्यातील नागपूर महापालिका असो, की शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिका, ही दोन्ही महानगरे कुठल्याही संकटात सुरक्षित ठेवण्यात आणि किमान सार्वजनिक सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहेत. ढिसाळ नियोजन, लहरी वृत्ती आणि गांभीर्याचा अभाव यामुळे नागपूर अधिवेशनात आज उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्य सरकारची अब्रू गेली आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले तरी देवेंद्र फडणवीस सरकारने नागपुरात अधिवेशन घेऊन ‘जलयुक्त नागपूर’ राज्याला दाखवून दिल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. या प्रकरणी सरकारने जाहीर माफी मागावी. विद्युत, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेचे अधिकारी या परिस्थितीस जबाबदार असल्याने अधीक्षक अभियंत्यापासून कार्यकारी अभियंता आणि सर्व दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा
मुंबईत अशाच पद्धतीचे पाणी साचले असते तर मुंबई महापालिकेवर आक्षेप घेतले असते. मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली असती. महापालिकेच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली गेली असती. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. पावसाळी अधिवेशनात नागपूरची परिस्थिती पूरमय झाली आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. नागपूर महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा, अशा जोरदार घोषणा शिवसेनेच्या सर्व आमदारांनी दिल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: