Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणात 41 हजार 185 क्युसेक्स पाण्याची आवक
ऐक्य समूह
Saturday, July 07, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: re1
प 35.63 टीएमसी पाणीसाठा प पावसाची संततधार सुरूच
5पाटण, दि. 6 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. जलाशयातील पाणीसाठ्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या शिवसागर जलाशयात 41 हजार 185 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 37.51 टीएमसी एवढा झाला आहे. आजच्या घडीला धरण 35.63 टक्के भरले आहे. दरम्यान, तालुक्यात पडणार्‍या पावसामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून निसरे येथील जुना फरशीपूल पाण्याखाली गेला आहे.
पाटण तालुक्यातील इतर विभागांमध्ये पावसाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील काठी, वळवण,  सोनाट, बामणोली, पाथरपुंज, प्रतापगड या अतिपर्जन्यमापन क्षेत्रातही जोरदार पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरणातील शिवसागर जलाशयात पाण्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.
शुक्रवार, दि. 6 रोजी सकाळी 5 ते सायंकाळी 6 पर्यंत कोयनानगर येथे 31 (1425), नवजा 32 (1292), महाबळेश्‍वर 69 (1143) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयातील पाणीपातळी 2089.51 फूट, 637.007 मीटर उंची व धरणातील पाणीसाठा 37.51 टीएमसी इतका झाला आहे तसेच शिवसागर जलाशयात 41 हजार 185 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या चोवीस तासामध्ये जलाशयात 2.19 टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसामुळे महाराष्ट्राला प्रकाशमय करणार्‍या कोयना धरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. अखेर दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात पावसाने अशीच साथ दिली तर 15 ऑगस्टपूर्वीच कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल यात तीळमात्र शंका नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: